सुनील कदम
कोल्हापूर : रत्नागिरी - नागपूर महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात केलेली डोंगरांची कापाकापी व खोदाईमुळे या महामार्गावर पन्हाळा ते हातखंबादरम्यान भूस्खलनाचा धोका वाढलेला दिसत आहे. प्रामुख्याने आंबा घाटात दरडी कोसळण्याचे आणि रस्ते खचण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
सध्या रत्नागिरी-नागपूर या चारपदरी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा ते रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा या गावापर्यंतचा भाग सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील डोंगर-दऱ्यातून जातो. महामार्गासाठी या भागातील अनेक डोंगर उभे कापण्यात आले आहेत. काही सखल भाग आणि दऱ्या भराव टाकून बुजविण्यात आल्या आहेत. पाच-दहा फुटांपासून ते शंभर फुटांपर्यंत उंचीचे डोंगरांचे कडे उभे तासण्यात आले आहेत. हजारो वृक्ष मातीखाली गाडले गेले आहेत, तसेच तोडले गेले आहेत. वर्षानुवर्षे याच वृक्षांच्या मुळ्यांमुळे सह्याद्रीतील पर्वतरांगांना घट्ट जखडून ठेवण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे कितीही मोठा पाऊस झाला, तरी या भागात भूस्खलनाच्या फार मोठ्या घटना घडलेल्या नाहीत; मात्र हजारो वृक्ष तोडले गेल्यामुळे डोंगरमाथे उजाड, बोडके आणि ठिसूळ झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आंबा घाटातील रस्ता वारंवार खचून वाहतूक बंद करावी लागत आहे. भूस्खलनाचे हे लोण उद्या पार पन्हाळ्यापर्यंत येण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
साधारणत: १९८० च्या दशकापासून सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील कोकण पट्ट्याला भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याचे दिसते. मुंबई-गोवा महामार्गासह अन्य महामार्गासाठी झालेली खोदाई, वेगवेगळ्या खनिजांसाठी होत असलेली सह्याद्री पठाराची पोखरण, बेसुमार वृक्षतोड आदी उपद्रव सुरू झाल्यापासूनच कोकणपट्ट्यात भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून येते. रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी झालेल्या व सध्या होत असलेल्या डोंगरांच्या कापाकापी व पोखरणीमुळे आता पन्हाळा ते हातखंबा या भागाला भूस्खलनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भागात पावसाचे प्रमाण वार्षिक ५००० मिलिमीटरपेक्षाही जादा आहे. त्यामुळे भूस्खलनाचा धोकाही तेवढाच मोठा असणार आहे. त्यामुळे याबाबतीत आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासनाने संभाव्य भूस्खलनाचा धोका टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
कोकणात भूस्खलनाच्या मोठ्या घटना
रत्नागिरी जिल्ह्यात १९८३ मध्ये दरडी कोसळण्याच्या लहान-मोठ्या पन्नासहून अधिक घटना घडून त्यामध्ये २३ लोक ठार झाले होते. १९८९ मध्ये पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या १२ ठिकाणी दरडी कोसळून त्यामध्ये भाजे येथील ३८ व्यक्ती गाडल्या गेल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात २००५ मध्ये दरड कोसळण्याच्या पंधराहून अधिक घटना घडून जवळपास २०० लोकांचा बळी गेला होता. २०१४ मध्ये माळीण येथील भूस्खलनाच्या घटनेत १५० लोक गाडले गेले. त्याचवर्षी आंबेगाव येथेही भूस्खलनाची मोठी घटना घडली होती. २२ जुलैै २०२१ रोजी रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळिये हे अख्खे गावच्या गाव भूस्खलनात गाडले जाऊन ८७ लोकांचा बळी गेला होता. १९ जुलै २०२३ रोजी रात्री भूस्खलनाच्या घटनेत रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी हे गाव गाडले जाऊन शंभरावर लोकांचा बळी गेला होता.