तानाजी खोत
कोल्हापूर : काही वर्षांपूर्वीपर्यंत जुना किंवा सेकंड-हँड मोबाईल घेणे म्हणजे पैशांची चणचण किंवा तडजोड मानली जायची. स्क्रीनवर स्क्रॅच दिसतील का, बॅटरी अर्ध्या तासात उतरेल का, अशी सतत धाकधूक असायची. आज मात्र हे चित्र ३६० अंशात बदलले आहे. देशातील गॅजेट मार्केटमध्ये सध्या एक मोठी क्रांती घडत असून, नवा कोरा बजेट फोन घेण्यापेक्षा प्रमाणित 'रिफर्बिश्ड' फ्लॅगशिप फोन घेण्याकडे ग्राहकांचा ओघ वेगाने वाढला असून, या मागणीचे मुख्य केंद्र मुंबई-पुण्यासारखी महानगरे नसून कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसारखी शहरे आणि ग्रामीण भारत ठरत आहे.
जागतिक उद्योग अहवालानुसार, भारतातील रिफर्बिश्ड स्मार्टफोन बाजाराचे मूल्य सध्या १.७५ अब्ज डॉलर्स (सुमारे १४,५०० कोटी रुपये) ओलांडले असून, वार्षिक १४.४ टक्क्यांहून अधिक वेगाने वाढणारी ही बाजारपेठ २०३४ पर्यंत ५.८ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याच्या अंदाज आहे. विशेष म्हणजे, नव्या स्मार्टफोन्सच्या विक्रीत थोडीशी शिथिलता आली असताना, सेकंड-हँड प्रमाणित बाजाराने तिप्पट-चौपट वेगाने उसळी घेतली आहे. देशातील एकूण रिफर्बिश्ड फोन मागणीपैकी ६० ते ६५ टक्के हिस्सा हा टियर-२, टियर-३ शहरे आणि ग्रामीण भागातून नोंदवला जात आहे.
नवीन स्मार्टफोन विरुद्ध रिफर्बिश्ड स्मार्टफोन वार्षिक वाढीचा वेग
नवीन स्मार्टफोन बाजाराची वाढ वार्षिक २ ते ५ टक्क्यांवर आली असताना, रिफर्बिश्ड स्मार्टफोन बाजार वार्षिक ८ ते १४.४ टक्क्यांच्या वेगाने वाढत आहे.
किमतीतील तफावत
बाजारात नवीन फ्लॅगशिप मॉडेल्ससाठी ६० हजार ते १ लाखांहून अधिक रुपये मोजावे लागतात. याउलट, रिफर्बिश्ड मॉडेल्स मूळ किमतीच्या तुलनेत थेट ४० ते ६० टक्के स्वस्त मिळतात.
बाजारातील हिस्सा
नवीन फोन मार्केटमध्ये शाओमी, व्हिव्हो, सॅमसंग आणि रियलमी आघाडीवर आहेत; तर रिफर्बिश्ड मार्केटमध्ये ॲपल, शाओमी आणि सॅमसंग या तीनच ब्रँडसचा मिळून ६७ टक्के हिस्सा आहे.
वॉरंटी आणि पडताळणी
नवीन फोनला मॅन्युफॅक्चररची १ वर्षाची वॉरंटी मिळते. रिफर्बिश्ड फोनलाही आता ३० हून अधिक तांत्रिक तपासण्यांनंतर ६ ते १२ महिन्यांची अधिकृत वॉरंटी दिली जाते.
पेमेंट पर्याय
नवीन फोनसाठी क्रेडिट कार्ड आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्याय असतात. रिफर्बिश्ड फोनसाठी स्थानिक वित्तसंस्था आणि यूपीआय आधारित सुलभ मासिक हप्त्यांची सुविधा उपलब्ध झाली आहे.
छोट्या शहरांमध्ये का वाढली मागणी?
कंटेंट क्रिएशन व ऑनलाईन अभ्यास : रील्स आणि ऑनलाईन क्लासेससाठी दर्जेदार कॅमेरा व वेगवान प्रोसेसर लागत असल्याने तरुणाई नवा बेसिक फोन घेण्याऐवजी जुना ‘आयफोन’ पसंत करत आहे.
सुलभ हप्ते : पूर्वी सेकंड-हँड फोनसाठी पूर्ण रोख रक्कम लागायची; आता वित्तसंस्था आणि यूपीआयमुळे रिफर्बिश्ड फोनवरही दरमहा सुलभ हप्ते उपलब्ध झाले आहेत.
महानगरांतील जलद अपग्रेड : मेट्रो शहरांमधील युजर्स दर १२ ते १८ महिन्यांत नवा फोन घेत असल्याने उत्तम स्थितीतील हँडसेटस्चा पुरवठा छोट्या शहरांकडे वळत आहे.
चांगल्या कंडिशनमधील १-२ वर्षे जुन्या फोनला उत्तम पुनर्विक्री मूल्य
स्थानिक मोबाईल डिलरच्या मते, पूर्वी जुना फोन विकणे आणि खरेदी करणे दोन्ही अनिश्चित होते. आता हे संपूर्ण मार्केट कॉर्पोरेट स्तरावर संघटित झाले आहे. बाजारात नवीन मॉडेल आले की आधीचा फोन देऊन नवा घेणारा एक मोठा वर्ग तयार झाला आहे. एक्सचेंज ऑफर्समुळे त्यांच्या चांगल्या कंडिशनमधील १-२ वर्षे जुन्या फोनला उत्तम पुनर्विक्री मूल्य मिळते, ज्यामुळे त्यांना नवीन मॉडेल अपग्रेड करणे सहज शक्य होते. दुसरीकडे, हाच फोन पूर्णपणे टेस्ट करून, नव्या वॉरंटीसह मध्यमवर्गीय किंवा तरुणांना परवडणाऱ्या किमतीत मिळतो. या दोन्ही गरजा एकत्र आल्याने हे मार्केट प्रचंड वेगाने विस्तारले आहे.