High profile prostitution | हायप्रोफाईल वेश्या अड्ड्यांची चलती! 
कोल्हापूर

High profile prostitution | हायप्रोफाईल वेश्या अड्ड्यांची चलती!

हप्तेबाजीचे अभय : एजंट-लॉज चालकांची साखळी; कनेक्शनवाले मालामाल

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : कोल्हापूर शहर, उपनगर, इचलकरंजी, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड एव्हाना गडहिंग्लजसह सीमा टापूत हप्तेबाजीतून हायप्रोफाईल वेश्या अड्ड्यांची चलती आहे. एजंट-लॉज चालकांची साखळी अन् कलेक्शनवाल्यांसह साहेबांच्या आश्रयामुळे वेश्या अड्ड्यांतील कारनामे बेधडक सुरू आहेत. रत्नागिरी-सोलापूर, पुणे-बंगळूर महामार्ग व ग्रामीण भागात निर्जन माळरानावरील अड्ड्यांवर ललनांचा रात्रंदिवस वावर दिसून येत आहे.

कोल्हापूर शहर, उपनगरांसह ग्रामीण भागातील काही वादग्रस्त लॉज व कॅफेमध्ये चालणार्‍या वेश्या अड्ड्यांचे कारनामे नव्याने नाहीत. छापे पडतात, पीडितांची सुटका होते. पंटरवर गुन्हे दाखल केले जातात; पण आजवर एकाही मालकांवर गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक केल्याचे उदाहरण नाही. केवळ चमकोगिरी, असहाय्य पीडितांना शरीरविक्रय करण्यास प्रवृत्त करणार्‍या टोळ्यांचा आजवर भांडाफोड झाला नाही. केवळ कागदोपत्री कारवाई झाली त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या, ही अवस्था.

कारवाईचा फार्सच

शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरीसह करवीर तालुक्यातील निर्जन, माळरानावरील लॉजशिवाय सांगली फाटा ते शिरोळ किंबहुना अंकली जुना टोल नाका, पुणे - बंगळूर महामार्गावर अनेक लॉज, कॅफेवर छापे टाकून कारवाईचा फार्स झाला; पण आजवर कुंटनखान्याला आश्रय देणार्‍या लॉजसह कॅफेचा परवाना रद्द करण्याची पावले प्रभारी अधिकार्‍यांनी उचलली नाहीत. साडेतीन हजारांवर लॉज अन् पाचशेवर कॅफेचा जिल्ह्यात पसारा आहे. यापैकी किती लॉज आणि कॅफेची पोलिस यंत्रणेकडून नियमित तपासणी होते, हा कळीचा मुद्दा आहे.

लॉजवर सापडलेल्या डायरीत नेमकं दडलंय काय?

खुपिरे (ता. करवीर) येथील सारथी लॉजवर विशेष पथकाने छापा टाकला. एका पीडितेची सुटका करून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. लॉजमालक कोण, याचा पत्ता नाही. विशेष म्हणजे, या कारवाईत पथकाच्या हाताला लागलेल्या डायरीत नेमके काय दडलंय, याची चर्चा आहे. हप्तेखोरीला सोकावलेल्या 5 जणांचा डायरीत नावासह उल्लेख असल्याची चर्चा आहे. खरे काय आणि खोटे काय वरिष्ठ अधिकारी जाणोत; पण लॉजवरील कारवाईपेक्षा ‘डायरी’चीच चर्चा आहे.

कलेक्शनवाला पंढरीनाथ कोण?

काळेधंदेवाल्यासह तस्करी टोळ्यांशी लागेबाधे ठेवणार्‍याविरुद्ध पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी थेट कारवाईचा इशारा दिल्याने पंटरचे महत्त्व वाढले आहे. शहरासह ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यात रात्रंदिवस ऊठबस करणारा आणि तडजोडी करणार्‍या ‘पंढरीनाथ’ च्या उलाढालीची चर्चा पोलिस वर्तुळात रंगली आहे. कोण हा पंढरीनाथ..? पंटरचे मोबाईल कॉल रेकॉर्डिंग तपासल्यास अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा होईल, अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT