Illegal liquor  Pudhari
कोल्हापूर

Liquor Smuggling | दारू तस्करीत वाढ; २१० दिवसांत १,४४१ तस्करांना बेड्या; ९ कोटींचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणासह दारू तस्करांनी शहर, जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. पुणे-बंगळूर महामार्गासह सीमाभागातील छुप्या मार्गाने कोट्यवधी रुपये किमतीच्या दारूची कोल्हापूरमार्गे पुणे, मुंबईसह मराठवाडा, विदर्भात दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. जानेवारी ते जुले २०२६ या काळात राज्य उत्पादन शुल्क आणि कोल्हापूर पोलिस दलाने १,४४१ दारू तस्करांना बेड्या ठोकून ९ कोटी २९ लाख ७२ हजार ५५७ रुपये किमतीच्‍या दारूसाठ्यासह मुद्देमाल हस्तगत केला.

शहर-उपनगरांत शंभरावर ओपन बार; महसुलावर पाणी

शहर-उपनगरांसह ग्रामीण भागात ओपन बारच्या शंभरावर अड्ड्यांवर तळीरामांची सायंकाळला हाऊसफुल्ल रेलचेल असते. स्वस्तास मस्त; पण झिंग आणणाऱ्या बनावट दारूचा ओपन बारवर मुबलक पुरवठा होत असल्याने शासनाला महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. निर्जनस्थळे, आडमार्गावर तस्करांचा तळ पडलेला दिसून येतो.

१.७५ कोटीचा बनावट दारूसाठा जप्त; परप्रांतीय तस्करास बेड्या

महामार्गावरून कोल्हापूरमार्गे बनावट दारूची बेधडक तस्करी होते. आंतरराज्य तस्करी टोळ्यांनी महामार्गावर कब्जा केल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. दि. १७ ऑगस्टला कोल्हापूर-सांगली बायपास रोडवर जयसिंगपूरजवळ कोल्हापूर पोलिसांनी १ कोटी ७५ लाखांचा दारूसाठा हस्तगत करून हरियाणातील मुस्का‍न ऊर्फ जावेद खान (वय २८) याला बेड्या ठोकल्या.

गोवा बनावट देशी दारू अथवा गावठी दारू शरीरास अपायकारक असल्याने सेवनामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. हातभट्टी अड्ड्यासह दारूच्‍या समूळ उच्चाटनासाठी जिल्ह्यात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. दारूनिर्मिती, विक्रीसह तस्करी आढळून आल्यास १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा.
स्नेहलता नरवणे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT