इचलकरंजी : भाजप कार्यालय येथे माजी आ. प्रकाश आवाडे आणि माजी आ. सुरेश हाळवणकर यांनी एकमेकांना केक भरवला. 
कोल्हापूर

Prakash Awade-Suresh Halwankar | आवाडे-हाळवणकरांमधील दुरावा झाला कमी

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील भाजपच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आ. प्रकाश आवाडे आणि माजी आ. सुरेश हाळवणकर यांनी एकमेकांना केक भरवला. या केकच्या गोडव्यामुळे आवाडे-हाळवणकर गटातील दुरावा कमी झाल्याचे चित्र दिसून आले. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

महापालिकेतील निविदा तसेच अन्य विविध कारणांवरून आवाडे-हाळवणकर गटातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. स्थानिक राजकारणातील या मतभेदांचे पडसाद वरिष्ठ पातळीवर पोहोचले होते. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री स्तरावरही या घडामोडी पोहोचल्या होत्या. महिन्याभराच्या कालावधीनंतर या दोन्ही गटांतील संवाद आणि समन्वय पुन्हा एकत्रित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गुरुवारी भाजप कार्यालयात पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. तसेच, गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त बैठक आयोजित केली होती.

यावेळी केक कापल्यानंतर प्रकाश आवाडे यांनी हाळवणकर यांना, तर सुरेश हाळवणकर यांनी आवाडे यांना केक भरवला. दोन्ही गटांतील दुराव्यानंतर दोन्हीही नेते काही कार्यक्रमांत एकत्र दिसले. मात्र, भाजप कार्यालयात चक्क एकमेकांना केक भरवत शुभेच्छा दिल्याने त्यांच्यातील दुरावा कमी झाल्याचे दिसून आले. नेते एकत्र आले असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये संवाद आणि समन्वय राहणार का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. यावेळी आ. राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतीश मुळीक, तानाजी पोवार, शशिकांत मोहिते आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT