रिक्षा, टॅक्सी पासिंगसाठी विलंब म्हणून आकारला जाणारा दैनंदिन 50 रुपयांचा दंड रद्द करा, या मागणीसाठी शहरातील रिक्षा व टॅक्सी वाहतूक मंगळवारी बंद राहणार आहे. Rickshaw file photo
कोल्हापूर

Kolhapur : कोल्हापुरात मंगळवारी रिक्षा, टॅक्सी बंद

Shambhuraj Pachindre

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : रिक्षा, टॅक्सी पासिंगसाठी विलंब म्हणून आकारला जाणारा दैनंदिन 50 रुपयांचा दंड रद्द करा, या मागणीसाठी शहरातील रिक्षा व टॅक्सी वाहतूक मंगळवारी बंद राहणार आहे.

कोल्हापुरात मंगळवारी रिक्षा, टॅक्सी बंद

  • रिक्षा, टॅक्सी पासिंगसाठी दैनंदिन 50 रुपयांचा दंड रद्द

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यादिवशीच रिक्षा बंद

  • विलंब दंड आकारणीविरोधात रिक्षा व टॅक्सीचालक संघटनांनी आंदोलन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्‍यादिवशीच रिक्षा बंद ठेवत विलंब दंड आकारणीविरोधात रिक्षा व टॅक्सीचालक संघटनांनी आंदोलन जाहीर केले आहे. कोल्हापूर शहरातील सुमारे 16 हजारांवर रिक्षा व टॅक्सी चालक या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा रिक्षा व टॅक्सी वाहनधारक समितीचे विजय देवणे, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, सतीशचंद्र कांबळे यांनी संयुक्तपणे शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

रिक्षा व टॅक्सी पासिंगसाठी विलंब म्हणून दररोज 50 रुपयांचा दंड आकारला जात आहे. यामुळे अनेक रिक्षाचालकांच्या दंडाची रक्कम 25- 30 हजारांवर गेली आहे. मुळातच रिक्षा व्यवसाय अनेक अडचणी, संकटांचा सामना करत सुरू आहे. त्याला पाठबळ देण्याऐवजी, रिक्षा व्यवसायच मोडीत काढण्यासाठी हा प्रकार सुरू आहे, का असा सवाल रिक्षाचालक व्यक्त करत आहेत. विलंब दंड रद्द करावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा रिक्षा व टॅक्सी वाहनधारक समितीकडून विविध मार्गाने आंदोलन सुरू आहे.

दंडाची आकारणी रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर समितीने धडक मोर्चा काढला. प्रादेशिक परिवाहन कार्यालयासमोर खर्डा भाकर आंदोलन केले, तरीही पासिंग विलंब दंडाबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. यामुळे हे आंदोलन करण्यात येत असल्याचे देवणे यांनी सांगितले. सोमवारी (दि. 24) रात्री 11.30 पासून रिक्षा वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मंगळवारी (दि. 25) सायंकाळी 5 पर्यंत संपूर्ण दिवसभर रिक्षा व टॅक्सी बंद राहणार आहेत. या आंदोलनाला जिल्ह्यातील अन्य शहरातील रिक्षाचालकांकडूनही पाठिंबा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

रिक्षा चालक – मालकांसाठी महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी मंडळ योजना त्वरित सुरू करावी. रिक्षा चालकांना शासनाने असंघटित कामगार म्हणून घोषित करावे. त्यांना असंघटित कामगारांच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा. आरटीओ कार्यालयात रिक्षा, टॅक्सी वाहनधारक आल्यानंतर 1 तासात कामातून मुक्त करावे. रिक्षा पासिंगसाठी एक खिडकी योजना सुरू करावी. प्रलंबित रिक्षा, टॅक्सी थांबे त्वरित मंजूर करावेत, नवीन थांब्यांना अर्ज केल्यावर किमान एक महिन्यात मंजुरी मिळावी, आदी मागण्यांसाठीही हा बंद असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेला अविनाश दिंडे, सुभाष शेटे, राकेश गायकवाड, महेश मस्के, अतुल पोवार, सादीक मुल्लांनी, मोहन बागडी, जाफर मुजावर, श्रीकांत पाटील, तानाजी भोसले, ईश्वरी चन्नी, अशोक जाधव, अरुण घोरपडे, शिवाजी पाटील, पोपट रेडेकर, संजय पाटील, महेश वासुदेव आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT