कोल्हापूर

Kolhapur murder news | कोल्हापूर हादरले! रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून अमानुष खून; मणेरमळा परिसरात खळबळ

शहरातील राजारामपुरीतील घटनेनंतर काही तासांतच दुसरी हत्या; हल्लेखोर पसार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर: शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, राजारामपुरीतील खुनाची घटना ताजी असतानाच मणेर मळा परिसरात एका रिक्षा चालकाचा दगडाने ठेचून अमानुष खून करण्यात आल्याचे सोमवारी (दि.९) सकाळी उघडकीस आले. प्रशांत बाबुराव पंडित (वय 37, रा. महालक्ष्मीनगर मणेरमळा) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. अवघ्या काही तासांतच शहरात खुनाची दुसरी घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत पंडित हे मणेर मळा रिक्षा स्टॉपचे माजी अध्यक्ष होते. सोमवारी पहाटे यादववाडी येथील हनुमान मित्रमंडळाच्या खोलीमागे त्यांचा मृतदेहआढळून आला. हल्लेखोरांनी प्रशांत यांच्या डोक्यावर दगडाने भीषण प्रहार करून त्यांचा चेंदामेंदा केला होता. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती .

शहरात दहशतीचे वातावरण

रविवारी सायंकाळी राजारामपुरी येथील मातंग वसाहतीत एका तरुणाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना घडली होती. या घटनेला काही तास उलटत नाहीत तोवर मणेर मळ्यात रिक्षा चालकाची दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. एकाच दिवशी दोन खुनाच्या घटनांनी कोल्हापूर शहर हादरून गेले आहे. तसेच परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे.

पोलिसांकडून शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासासाठी श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण केले आहे. हल्लेखोर अद्याप पसार असून पोलिसांना त्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT