कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित कामे एप्रिलअखेर पूर्ण करून 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी लोकार्पणासाठी सज्ज करूया, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाच्या विविध विभागांना दिले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
शुक्रवारी शेंडा पार्कमध्ये सीपीआरसह राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय, शासकीय ग्रामीण रुग्णालय पथक- कागल, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय -मौजे सांगाव, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय -पिंपळगाव खुर्द, शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय- उत्तूर या विविध शासकीय संस्थांच्या आढावा बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शेंडा पार्कमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आल्यानंतर परदेशातील एखाद्या प्रगत परिसरात आल्यासारखे वाटले. हे संपूर्ण संकुल विकसित होईपर्यंत निधी 3 हजार कोटींच्या घरात जाईल. सीपीआरच्या इमारतींसह भौतिक सेवासुविधा आणि यंत्रसामग्रीसाठी 200 कोटींहून अधिक निधीतून नूतनीकरण होत आहे.
डॉ. सदानंद भिसे म्हणाले, मुख्य प्रशासकीय इमारतीसह ऑडिटोरियम, शवागार, ग्रंथालय, परीक्षा भवन, मुला -मुलींचे वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. अभिजित अहिरे, डॉ. भाग्यश्री खोत, डॉ. गिरीश कांबळे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेरिटेजचे सौंदर्य अबाधित
सी.पी.आर.ची ऐतिहासिक जुनी मुख्य बिल्डिंग हेरिटेज म्हणजेच वारसास्थळ म्हणून जतन केली आहे. या इमारतीचे मूळ सौंदर्य तसेच ठेवून नूतनीकरण केल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी कंत्राटदाराचे आवर्जून कौतुक केले.
विविध कामांचे सादरीकरण
बैठकीत सीपीआरच्या मुख्य हेरिटेज इमारतीसह दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, सरस्वती येथील नूतनीकरण, सर्व काँक्रीट रस्ते, 8 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 16 शेड, बाह्यरुग्ण विभाग, दुसरा मजला आदी झालेल्या कामांचे सादरीकरण करण्यात आले.