कोल्हापूर : ‘गोकुळ’ व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या आहेत. नेत्यांना जेव्हा गरज असते तेव्हा त्या खेचल्या जातात. या माध्यमातून यंत्रणा जुंपली जाते. आता येत्या तीन-चार महिन्यांत ग्रामीण भागात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी निवडणुकीचे नाव न घेता ‘गोकुळ’च्या आढावा बैठकीत सुपरवायझर्सना ‘कानमंत्र’ देण्यात आला आहे. नविद मुश्रीफ अध्यक्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा बँकेचे तालुक्यात असलेले इनस्पेक्टर्स व ‘गोकुळ’चे गावागावांत, दूध संस्थांशी थेट जोडलेले सुपरवायझर्स हे गावांतील कर्जदार व दूध उत्पादकांशी थेट संपर्कात असतात. दैनंदिन संपर्क व गावांतील माणसांची खडान्खडा असलेली माहिती ही नेत्यांना मार्गदर्शक असते.
याच माहितीच्या आधारावर नेत्यांना गावोगावी काय चालले आहे, आपला कोण? काठावर कोण? व विरोधकांच्या हाती लागणारा कोण? याची इत्थंभूत माहिती मिळत असते. त्यामुळे ज्याच्याकडे बँक इनस्पेक्टर्स व दूध संघांचे सुपरवायझर्स त्याचे तालुक्यात राजकारण हे समीकरण आहे. गावागावांत काय चालले आहे याची सर्व माहिती या दोन घटकांकडे असते. त्यामुळे त्यांना नेत्यांचे कान आणि डोळे असे मानले जाते.
दैनंदिन कारभारावर नियंत्रण हे त्यांचे काम असते. त्या माध्यमातून त्यांच्याकडे आपसूकच ही माहिती येत असते, तीच नेत्यांपर्यंत पोहोचविली जाते. त्या आधारावर नेत्यांचे काम चालत असते. कार्यकर्ता सांभाळणे, विरोधकांकडे त्याला जाण्यापासून रोखणे, त्याची नाराजी दूर करणे हे सगळे याच माध्यमातून केले जाते.
आताही ‘गोकुळ’च्या सुपरवायझर्सची आढावा बैठक झाली. या बैठकीत दूध संकलनाचा आढावा घेण्यात आला. गावोगावी दूध संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे ते पूर्ण करा. दूध संकलन वाढवा, त्याचबरोबर येणारे तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असून, ते कामाचे आहेत हे लक्षात ठेवा, असा एका वाक्याचा ‘कानमंत्र’ ज्येष्ठ संचालकांनी सुपरवायझर्सना दिला. आता पुढचे तीन महिने कोणत्या कामाचे आहेत आणि ते कशासाठी महत्त्वाचे आहेत, हे सांगण्याची गरज नसते. नेत्यांना पुढच्या राजकारणासाठी पूरक माहिती देणार्या सुपरवायझर्सना याची पुरेपूर कल्पना असते.
‘गोकुळ’चे सुपरवायझर म्हणचे गावांची चालती-बोलती ‘कुंडली’च असते. त्यामुळे त्यांच्याकडून येणार्या माहितीची खातरजमा करून वाटचाल करणे व पुढील हालचालींसाठी यंत्रणा हाताशी ठेवणे हे नेत्यांसाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळेच जिल्हा बँक व ‘गोकुळ’च्या निवडणुकीत नेते सगळी ईर्ष्या पणाला लावतात.