कोल्हापूर : गौण खनिजप्रकरणी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांचे केलेले निलंबन तीन दिवसांत मागे घेतले जाईल, अशी ग्वाही देत अन्य मागण्याही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी मान्य केल्या. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पुणे विभागात सुरू असलेला महसूल विभागाचा संप मागे घेण्यात आला, तर संपूर्ण राज्यात शुक्रवारपासून होणारा संप स्थगित करण्यात आला. कोल्हापूरसह पुणे विभागातील महसूलचे अधिकारी, कर्मचारी शुक्रवारपासून कामावार हजर होणार आहेत. दरम्यान, तिसर्या दिवशी गुरुवारीही महसूलचे जिल्ह्यातील सर्व काम ठप्प झाले होते.
विधानसभा अधिवेशनात गौण खनिजप्रकरणी पुणे विभागातील तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठ्यांचे निलंबन केले होते. ही कारवाई अन्यायी आणि एकतर्फी असल्याचा आरोप करत पुणे विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी मंगळवारपासून सामूहिक रजेवर जात काम बंद आंदोलन सुरू केले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांत, तहसील, पुनर्वसन आदी महसूलच्या सर्वच कार्यालयांतील कामकाज बंद राहिले. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तर दिवसभर शुकशुकाट होता.
दरम्यान, मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दुपारी संघटनांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक घेतली. या बैठकीत गौण खनिज प्रकरणातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे निलंबन तीन दिवसांच्या आत मागे घेतले जाईल, त्यासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून तत्काळ अहवाल मागवला जाईल. या कालावधीतील जिल्हाधिकारी स्तरावर गौण खनिज प्रकरणात झालेल्या सर्व कारवाया मागे घेण्याचा निर्णय झाला. यासह पालघर मधील कर्मचारी यांचे निलंबन तत्काळ मागे घेतले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
गौण खनीजप्रकरणी अनधिकृत वाहतुकीला आळा घालण्यासाठी नवीन प्रणाली विकसित केली जाईल. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी यांचा त्रास कमी होईल. अधिकारी, कर्मचार्यांच्या वेतन श्रेणी वाढीचा विशेष प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत तो मंजूर करून घेतला जाईल. महसूल सेवकांचे आदोलन काळातील वेतन तत्काळ अदा केले जाईल. महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधी सोबत दि.19 रोजी बैठक घेऊ, पोलिस विभागाच्या धर्तीवर नायब तहसीलदार पदासाठी विभागांतर्गत परीक्षा घेतली जाईल आदी मागण्या यावेळी मान्य करण्यात आल्या. मागण्या मान्य केल्याने सर्व महसूल कर्मचारी शुक्रवारपासून कामावर हजर होतील, असे महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले.