kolhapur | ठाण्यातील निवृत्त शिक्षिकेचा राष्ट्रनिष्ठेचा असाही आदर्श!  
कोल्हापूर

kolhapur | ठाण्यातील निवृत्त शिक्षिकेचा राष्ट्रनिष्ठेचा असाही आदर्श!

विजया वैद्य यांनी लष्कराला सुपूर्द केली आयुष्याची एक कोटीची पुंजी

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केले आहे. त्यानुसार अनेकजण आपापल्या परीने काटकसर करत आहेत. ठाण्यातील एका निवृत्त शिक्षिकेनेही याबाबतीत पुढाकार घेतला आहे. मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर या शिक्षिकेने आपल्या आयुष्याची निवृत्तीच्या काळानंतर उपयुक्त ठरणारी सर्व पुंजी एक कोटी रुपये भारतीय सेनेला प्रदान केली आहे.

विजया हरी वैद्य (वय 84) या ठाण्याच्या शिवसमर्थ विद्यालयातून 1998 मध्ये सेवानिवृत्त झाल्या. सेवाकाळात त्यांनी केलेली बचत, निवृत्तीनंतर त्यांना मिळालेले सानुग्रह अनुदान आणि कुटुंबाची संपत्ती अशी एकत्रित एक कोटी रुपयांची पुंजी लष्कराकडे सुपूर्द केली आहे. त्यांनी ‘राष्ट्र प्रथम’ या निर्णयाला पहिली पसंती दिली. आपल्या ऐेहिक आणि भौतिक सुखापेक्षा भारतीय जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांची सेवा अधिक महत्त्वाची आहे, असे समजून त्यांनी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे.

विजया वैद्य या मूळच्या देवगड तालुक्यातील फणसे गावच्या. धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेत त्यांचे शिक्षण झाले. या संस्थेत बहुतांश शिकणार्‍या मुली या अनाथ असल्याने संस्थेच्या सर्व खर्चाचा भार उदार व्यक्तींच्या देणगीवर अवलंबून असे. दहावीमध्ये त्या संस्थेत शैक्षणिक शुल्क देऊन (पेड सीट) शिकत होत्या. त्यावेळी अनाथ मुलींना मिळणार्‍या देणगीत तुटवडा निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम मुलींच्या जेवणावर झाला. या घटनेची कल्पना कर्वे यांचे पुत्र भास्कर कर्वे यांनी सर्व पेड सीटवरील विद्यार्थिनींना दिली, तेव्हा त्याचा खोलवर परिणाम विजया वैद्य यांच्या मनावर झाला. देणगीअभावी संस्थेतील अनाथ विद्यार्थिनींना दोन वेळचे जेवण मिळू शकत नाही, याची सल त्यांच्या मनाला बोचत होती. आयुष्यात दोन घटनांचा मोठा प्रभाव त्यांच्या मनावर होता. अलीकडेच त्यांनी आपली आर्थिक पुंजी लष्कराच्या हवाली करून आपल्या मनाचा भार हलका केला आहे.

कोल्हापूरच्या गुणे कुटुंबीयांनीही दिली होती देणगी

विजया वैद्य यांनी लष्कराच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर व क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट या संस्थांसह आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युलिटीज वेल्फेअर फंड, आर्मी वूमन वेल्फेअर फंड आणि आर्मी सेंट्रल वेल्फेअर फंड या संस्थांना धनादेशाद्वारे ही रक्कम चुकती केली आहे. विजया वैद्य यांच्याप्रमाणेच कोल्हापुरातील डॉ. प्रकाश गुणे यांच्या कुटुंबीयांनीही गतवर्षी भारतीय लष्कराकडे कोणताही गाजावाजा न करता, एका कर्तव्य भावनेतून एक कोटी रुपयांची देणगी दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT