Cyber Fraud  pudhari News
कोल्हापूर

Teacher Fraud Case | निवृत्त मुख्याध्यापकास भामट्यांकडून १८ लाखांचा गंडा

१० लाख गोठविण्यात सायबर पोलिसांना यश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : तुमच्या सीमकार्डचा वापर करून मनी लाँडरिंग झाले असल्याचे भासवून निवृत्त मुख्याध्यापकाला सायबर भामट्यांनी १८ लाखांचा गंडा घातला. १० ते २९ सप्टेंबर या कालावधीत घडलेल्या या घटनेची फिर्याद सुनील बाबुराव कुरणे (वय ६०, रा. कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणुकीतील १० लाख रुपये गोठविण्यात यश आले.

कुरणे यांना १० सप्टेंबरला विशाल कुमार नावाच्या व्यक्तीने फोन केला. ‘तुमच्या सीमकार्डचा वापर करून मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग झाले असून, पोलिसांकडून तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती घातली. यानंतर काही दिवसांनी विशालने वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याचे सांगून सुनीलकुमार गौतम, प्रदीपसिंग यांच्यासोबत फोन जोडून दिला. भामट्यांपैकीच एकाने आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या खात्यातील रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्या सूचनांचे पालन करा, असे सांगितले. त्याप्रमाणे १६ सप्टेंबरला ८ लाख रुपये, २५ सप्टेंबरला ६ लाख रुपये, तर २९ सप्टेंबरला ४ लाख रुपये असे एकूण १८ लाख रुपये वर्ग केले. ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत पैशांची मागणी सुरूच ठेवली. अखेर पंधरा दिवसांनी त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली.

सायबर पोलिसांची सतर्कता

फसवणुकीचे १८ लाख देशातील विविध खात्यांवर वर्ग झाले. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय हारूगडे यांनी बॅंकांशी ई-मेलद्वारे संपर्क केला. एका दिवसातच सुमारे १० लाखांची रक्कम गोठविली. इतर रक्कम मिळविण्यासह संशयितांचाही शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT