Gokul Election | नेत्‍यांनी सांगितले ७७४९; प्रत्‍यक्षात जमले ५४३९ ठराव 
कोल्हापूर

Gokul Election | नेत्‍यांनी सांगितले ७७४९; प्रत्‍यक्षात जमले ५४३९ ठराव

राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शनात सांगितलेला आकडा फुगीर; प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर चित्र स्‍पष्‍ट

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : भाजप, राष्‍ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, जनसुराज्‍य आदी पक्षांच्‍या नेत्‍यांनी शक्तिप्रदर्शनात केलेल्‍या दाव्‍यानुसार ७ हजार ७४९ ठराव जमा होणे अपेक्षित होते; मात्र ठराव दाखल करण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर सहायक निबंधक कार्यालयात प्रत्‍यक्षात दाखल झालेल्‍या ठरावांची संख्‍या ५ हजार ४३९ इतकी आहे. त्‍यानुसार ठरावांचा २ हजार ३१० फुगीर आकडा असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

गोकुळची निवडणुक प्रक्रिया सुरू असून बुधवारी (दि. १) ठराव दाखल करून घेण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाली. महिनाभर सुरू असलेल्‍या या प्रक्रियेमध्‍ये एकूण ५,४३९ ठराव दाखल झाले. भाजप, राष्‍ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, जनसुराज्‍य शक्‍ती या सर्वच पक्षांनी शक्तिप्रदर्शन करत सहायक निबंधक कार्यालयात ठराव दाखल केले. शक्तिप्रदर्शनापूर्वी सर्वच पक्षांनी त्‍यांच्‍या ठरावधारकांचा मेळावा घेतला. मेळव्‍यामध्‍ये राष्‍ट्रवादीकडून मंत्री हसन मुश्रीफ, भाजपकडून खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेकडून आमदार चंद्रदीप नरके, काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांनी, तर जनसुराज्‍यकडून आमदार विनय कोरे यांनी ठरावांच्‍या आकड्यांची घोषणा केली. तसेच कोणत्‍या तालुक्‍यातून कोणत्‍या नेत्‍याकडून किती ठराव पक्षाकडे आले याची विस्‍तृत माहिती जाहीर केली. नेत्‍यांनी सांगितलेले आकडे आणि प्रत्‍यक्षात जमलेले ठराव यांची आकडेवारी पाहता यामध्‍ये मोठी तफावत दिसून येते.

राष्‍ट्रवादी दाव्‍यावर ठाम

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री मुश्रीफ यांनी १,९८२ ठराव असल्‍याचे जाहीर केले होते. ठराव दाखल करण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी तालुकानिहाय ठरावांची संख्‍या जाहीर केली. १,९७६ ठराव जमल्‍याचे सांगितले. राष्‍ट्रवादी दाव्‍यावर ठाम असल्‍याचेही पाटील-आसुर्लेकर यांनी सांगितले. बुधवारी अखेरच्‍या दिवशी चेअरमन नविद मुश्रीफ यांनी आणखी ११ ठराव दाखल केले.

अवसायनातील १२८ दूध संस्‍थांचा बुधवारी फैसला

कोल्‍हापूर : अवसायन प्रक्रियेतील आणखी १२८ दूध संस्‍थांचा सहायक निबंधक कृष्‍णा ठाकरे यांनी अंतिम केलेल्‍या अवसायनाच्‍या आदेशास कोल्‍हापूर सर्किट बेंचने बुधवारी (दि. १) स्‍थगिती दिली. तसेच अंतिम सुनावणी बुधवार, दि. ८ रोजी होणार आहे. न्‍यायमूर्ती शैलेश ब्रम्‍हेे यांच्‍यासमोर सुनावणी झाली.

सहायक निबंधक ठाकरे यांच्‍या अवसायनाच्‍या निर्णयाला सर्वप्रथम फणसवाडी (ता. भुदरगड) येथील हनुमान दूध संस्‍थेने आव्‍हान दिले. सुनावणी दरम्‍यान न्‍यायालयाने या प्रकरणात सखोल चौकशी झालेली नाही, चुकीच्‍या पद्धतीने कारवाई केल्‍याचा ठपका ठेवत अवसायनाच्‍या आदेशास स्‍थगिती दिली. फणसवाडीच्‍या दूध संस्‍थेचा निर्णय अन्‍य संस्‍थांना दिलासा देणारा होता. त्‍यामुळे यानंतर आणखी ११२ संस्‍थांनी न्‍यायालयात धाव घेतली. दूध सस्‍थांच्‍या वतीने ॲड. एस. एस. पटवर्धन, ॲड. भूषण मंडलिक यांनी, तर शासनाकडून एस. पी. कांबे यांनी बाजू मांडली.

हनुमान दूध संस्‍थेचीही ८ जुलैला सुनावणी

फणसवाडीच्‍या हनुमान दूध संस्‍थेची पुढील सुनावणी ३ ऑगस्‍ट २०२६ ला होणार होती; मात्र बुधवारी ११२ दूध संस्‍थांच्‍या सुनावणीदरम्‍यान न्‍यायालयाने अंतिम सुनावणी ८ जुलैला ठेवली. हनुमान दूध संस्‍थेचीही सुनावणी आता बुधवार, दि. ८ रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT