सागर यादव
कोल्हापूर : दहा-बारा दिवस झाले, कुस्ती स्पर्धेसाठी परदेशात गेलेली नात युद्धामुळं अडकून पडली आहे. फोनवर बोलणं झालं, ती सुखरूप आहे. पण तिला समोर बघितल्याबिगर जीव भांड्यात पडणार नाही, अशा शब्दांत पै. रेश्मा माने हिच्या आजी रत्नाबाई राजाराम माने यांनी नातीबद्दल लागलेली काळजी व्यक्त केली.
अल्बेनिया देशाची राजधानी तिराणा येथे युनायटेड वर्ल्ड रेसलिंग स्पर्धेसाठी गेलेला भारतीय महिला कुस्ती संघ आखाती देशातील युद्धामुळे अडकून पडला आहे. या संघात कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा अनिल माने (रा. वडणगे, ता. करवीर) हिच्यासह देशभरातील 14 कुस्तीपटू मुलींसह 18 जणांचा समावेश आहे. पालकांनी मोबाईल व्हिडीओ कॉलवरून संवाद साधून मुलींची विचारपूस सुरू ठेवली आहे. दरम्यान, भारत सरकारने तिराणा येथे विमानतळाजवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये राहाण्याची व्यवस्था केली आहे.
आजीबरोबरच रेश्माचे आजोबा राजाराम माने, आई कल्पना माने, वडील अनिल माने, चुलते भीमराव माने, चुलती संजीवनी माने, भाऊ अतुल, युवराज व ऋषीकेश माने यांसह संपूर्ण माने भावकी परदेशात अडकलेल्या पै. रेश्माची काळजी करत आहेत. टीव्ही, मोबाईलवरील माहितीद्वारे युद्ध परिस्थिती, विमानसेवेचे अपडेट आणि भारतीय संघाच्या परतीच्या प्रवासाची माहिती माने कुटुंंबीय घेत आहेत. व्हिडीओ कॉलद्वारे त्यांनी रेश्माशी संवाद साधून राहणे-खाण्याच्या व्यवस्थेबद्दलची माहिती, भारतीय संघातील तिच्या सहकारी मुली, संघ व्यवस्थापक-प्रशिक्षक यांच्याशी बोलून परतीच्या प्रवासाबद्दलची माहिती गेल्या दोन-तीन दिवसांत घेतली.
आज परतीचा प्रवास सुरू होणार
भारतीय कुस्ती संघाला 4 मार्च रोजीची परतीच्या प्रवासाची विमान तिकिटे उपलब्ध झाल्याची महत्त्वाची माहिती रेश्माचे वडील अनिल माने यांनी दिली. तिराणा येथून सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी (भारतीय वेळ दुपारी 12 वाजता) विमानाचे उड्डाण होईल. इस्तंबुल, अल्मेटी अला मार्गे हवाई प्रवास करून 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत विमान दिल्लीत पोहोचणार आहे. रेश्मा पुढील काही दिवस आशियाई स्पर्धा सराव शिबिरासाठी दिल्ली येथे थांबणार आहे.