कोल्हापूर : सागर यादव
'नाव - आक्कुबाई बाळकृष्ण घाटगे, उमर वर्षे १८, धंदा सरकारी नोकरी, राहणार करवीर पेटा...' तब्बल शंभर वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक दस्तऐवजावरील हा मजकूर. यावरून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात महिलांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण असल्याचा महत्त्वपूर्ण संदर्भ इतिहास अभ्यासक अॅड. डॉ. उदयसिंह मानसिंगराव राजेयादव यांनी शोधला आहे.
महाराष्ट्र सरकारने महिलांविषयक धोरण १९९४ मध्ये जाहीर झाले अन शासकीय नोकऱ्यांत प्रथमतः ३० टक्के आरक्षण सुरू झाले. केंद्रीय धोरणामध्ये ३ ऑगस्ट २०२४ रोजी 'वुमन रिझर्वेशन बिल' संसदेमध्ये लागू करून महिलांसाठी सरकारी नोकरीमध्ये ३३ टक्के आरक्षण लागू केले; पण शंभर वर्षांपूर्वीचा विचार करता क्रांतिकारक निर्णयाची अंमलबजावणी करणारे राजर्षी शाहू महाराज यांचे स्त्री शिक्षण तसेच महिलांना सरकारी नोकरीमध्ये रूजू केल्याचे त्यावेळेच्या मोडी कागदपत्रांतून पाहायला मिळते.
कोल्हापूर जिल्हा निबंधक नोंदणी व मुद्रांक कार्यालयातील मळ मोडी लिपीतील दस्तांमधील हा महत्त्वपूर्ण कागद डॉ. राजेयादव यांनी प्रकाश झोतात आणला आहे. स्थावर मिळकतीसंबंधीच्या दस्तऐवजांत नोंद
नाव - आक्कुबाई बाळकृष्ण घाटगे, जात - मराठा, उमर वर्षे १८, धंदा सरकारी नोकरी! असा मजकूर असणारे घर-जागा संदर्भातील खरेदी-विक्रीचा दस्त त्या काळात सरकारात रितसर रजिस्टर नोंदणी झाला आहे. चार पानाच्या या दस्तावर तत्कालीन सब रजिस्टार करवीर वगैरे सरकारी अधिकाऱ्यांच्या सह्याही आहेत. विशेष म्हणजे शंभर-सव्वाशे वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांच्या राज्यकारभारामध्ये महिलांना समानतेची वागणूक महिला सरकारी नोकरीमध्ये कार्यरत होत्या. राजर्षी शाहू महाराज हे कर्ते द्रष्टे समाज सुधारक होते. याचे उदाहरण म्हणजे शाहकालीन महिलांविषयी धोरण दर्शवणारे १९१० सालातील हे मोडी लिपीतील दस्तऐवज आहे. इसवी सन १९०९ सालातील पहिल्या नंबरच्या बुक स्थावर मिळकतीसंबंधी दस्तऐवजांचे रजिस्टर गाव / तालुका करवीर मध्ये खरेदी-विक्रीच्या अनुषंगाने १५ जून १९१० रोजीचा हा दस्त आहे.
सरकारी नोकरीत असणाऱ्या अक्कुबाई घाटगे यांच्या विषयीचा संदर्भ असणारा राजर्षी शाहू कालीन मोडी लिपीतील कागद कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी महिला सबलीकरणासाठी विविध उपाययोजना केल्या, महिलांसंदर्भातील पारंपरिक चुकीच्या रुढीपरंपरा बदलण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. या संदर्भातील तत्कालीन कागदपत्रे, ऐतिहासिक मोडी लिपीतील शेकडो कागदपत्रे ठिकठिकाणी आहेत. त्यांचे वाचन आणि त्यावर सखोल अभ्यास होणे अत्यावश्यक आहे. - ॲड. डॉ. उदयसिंह राजेयादव, इतिहास अभ्यासक