आशिष शिंदे
कोल्हापूर : कोल्हापूरच्या संशोधकांनी मानवी डोळ्यातील नैसर्गिक नेत्रपटलाप्रमाणे (रेटिना) कार्य करणारे डोळ्याचे स्मार्ट व वायरलेस कृत्रिम नेत्रपटल विकसित केले असून, द़ृष्टिहीनतेवर मात करण्याच्या दिशेने हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मानवी डोळ्यातील प्रकाश संवेदना ग्रहण करणार्या पेशी (फोटोरिसेप्टर्स) निकामी झाल्यास कायमचे अंधत्व येते. अशा रुग्णांसाठी हे कृत्रिम नेत्रपटल भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरेल.
कृत्रिम नेत्रपटल पूर्णपणे वायरलेस असून, त्यावर प्रकाश पडताच त्याचे विद्युत लहरींमध्ये रूपांतर होते. त्यामुळे मेंदूच्या पेशींना नैसर्गिकरीत्या उत्तेजन देता येते. संशोधकांनी प्रयोगशाळेत मेंदूच्या पेशींवर (हिप्पोकॅम्पल न्यूरॉन्स) या उपकरणाची यशस्वी चाचणी केली आहे. प्रकाश टाकताच संबंधित पेशींमध्ये चेतना निर्माण झाल्याचे प्रयोगांती स्पष्ट झाले आहे. ही प्रक्रिया नॉन थर्मल असल्याने डोळ्यातील इतर नाजूक पेशींना धोका पोहोचत नाही.
जगभरातील हजारो लोकांना अंधत्वाच्या खाईत लोटणार्या रेटिनल डिजनरेशनसारख्या आजारावर मात करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरू शकते. डोळ्यातील रेटिना हा प्रकाश आणि मेंदू यांच्यातील दुवा असतो. रेटिनल डिजनरेशनमध्ये हा दुवा तुटतो. कोल्हापुरातील संशोधकांनी विकसित केलेले कृत्रिम नेत्रपटल हा तुटलेला दुवा पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करते. या प्रकल्पात अमेरिका, तुर्की आणि दक्षिण कोरियातील संशोधकांनी योगदान दिले आहे.
क्वांटम डॉटस्, पॉलिमरचा वापर
नेत्रपटल (रेटिना) हा डोळ्याच्या सर्वात आतील बाजूस असलेला एक अत्यंत नाजूक आणि प्रकाशसंवेदनशील पेशींचा स्तर आहे. ज्याप्रमाणे कॅमेर्यामध्ये फिल्म किंवा डिजिटल सेन्सर असतो, तसेच कार्य नेत्रपटल मानवी शरीरात करते. संशोधकांनी सीयू2एसएनएस3 या मटेरियलचे अत्यंत सूक्ष्म क्वांटम डॉटस् आणि पॉलिमरचा वापर करून नेत्रपटलासारखाच एक लवचिक थर तयार केला आहे. हा थर रेटिनाच्या कार्यपद्धतीची नक्कल करतो आणि प्रकाशाचे विद्युत संकेतांत रूपांतर करतो.
भविष्यात अंधत्वावर ठरेल प्रभावी उपचार
रेटिनल डिजनरेशन हा डोळ्याचा विकार असून रेटिनावरील प्रकाश ग्रहण करणार्या पेशी हळूहळू नष्ट होतात. त्यामुळे दृष्टी कमी होत जाऊन अखेरीस अंधत्व येते. सध्या यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत. अशावेळी हा कृत्रिम रेटिना वापरता येईल.
लवचिक आणि सेल्फ पॉवर्ड
सध्याचे रेटिनल इम्प्लांटस् महागडे, जाड आणि बाह्य विद्युत पुरवठ्यावर अवलंबून असतात. मात्र, कोल्हापुरातील संशोधकांनी विकसित केलेली ही बायोइंटरफेस फोटोकॅपॅसिटिव्ह फिल्म पातळ, लवचिक आणि सेल्फ पॉवर्ड आहे. भविष्यात तो रुग्णांसाठी अधिक सुरक्षित व सोपा पर्याय ठरू शकतो.