कोल्हापूर

कोल्हापूर : पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन निर्मितीसाठी भारतीय व जर्मन पेटंट; प्रा. डॉ. सागर डेळेकर

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पाणी आणि सूर्यप्रकाश यांसारख्या नैसर्गिक स्रोतापासून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती, त्याचा इंधन म्हणून वापर व कमी कार्बन उत्सर्जन यावर केलेल्या संशोधनाला भारत व जर्मन यांचे पेटंट मिळाले आहे. शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. सागर डेळेकर व संशोधक विद्यार्थी प्रमोद अभंगराव कोयले यांनी हे संशोधन केले आहे. नॅनो समिश्रे आधारित हायड्रोजन निर्मितीसाठी पाण्याचे विभाजन याचा सखोल अभ्यास केला. या संशोधनाला विज्ञानामध्ये एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संपूर्ण जगात सध्या पेट्रोल, डिझेल, कोळसा इत्यादी पारंपरिक इंधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे, जो आगामी भविष्यात एके दिवशी नक्की संपुष्टात येईल. त्याचबरोबर वाढते जागतिक प्रदूषण, उच्च कार्बन उत्सर्जन व त्यामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्या इत्यादींसाठी हे पारंपरिक स्रोत जबाबदार आहेत. बहुतेक शास्त्रज्ञ हे पाणी, सूर्यप्रकाश, वारा इत्यादी नैसर्गिक घटकांचा वापर करून इंधन स्रोत विकसित करीत आहेत. यामध्ये हायड्रोजनचा वापर ऑटोमोबाईल्स, उद्योग, वीज उत्पादन आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये केला जाऊ शकतो. याच अनुषंगाने प्रा. डेळेकर व कोयले यांनी धातू ऑक्साईड, मेटल-ऑरगॅनिक फ—ेमवर्क व कार्बन अब्जांशनलिका आधारित नॅनो समिश्रे वापरून फोटो इलेक्ट्रोकेमिकल पद्धतीने पाण्याचे विभाजन व त्याचा अभ्यास केला. ही नॅनो समिश्रे पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत. अमेरिकेच्या 'अप्लाईड नॅनो मटेरियल्स' आणि 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ हायड्रोजन एनर्जी' या संशोधन पत्रिकांमध्येही प्रकाशित झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT