कोल्हापूर / उगार खुर्द : साखर उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रातील मार्गदर्शक, ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र विनायक (आर. व्ही.) ऊर्फ राजाभाऊ शिरगावकर यांचे गुरुवारी निधन झाले. कोल्हापुरातील वैभव हौसिंग सोसायटीतील राहत्या घरात सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने उगार शुगर वर्क्स (उगार खुर्द, कर्नाटक), शिरगावकर उद्योग समूहाचा आधारवड कालवश झाला. उगार खुर्द (ता. कागवाड) येथे दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
द उगार शुगर वर्क्स, एस. बी. रिशेलर्स प्रा. लि., सिनर्जी ग्रीन, हॉटेल पॅव्हेलियन, आय रिसर्च आणि तारा टाईल्स अशा ‘शिरगावकर ग्रुप ऑफ इंडस्टीज’चे ते अध्यक्ष होते. विविध औद्योगिक संघटनांवर कार्यरत उद्योजक सचिन शिरगावकर यांचे ते वडील आणि सोहन शिरगावकर यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात मुलगा सचिन, मुलगी माधवी राजू दळवी, सून, जावई, नातवंडे यांच्यासह भाऊ प्रफुल्ल शिरगावकर, चुलत भाऊ शिशिर, पुतणे आणि उगार कारखान्याचे एमडी चंदन शिरगावकर असा मोठा परिवार आहे.
कोल्हापुरातील निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी औद्योगिक, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. कोल्हापूर येथून दुपारी साडेतीन वाजता त्यांचे पार्थिव उगार खुर्द येथे नेण्यात आले. अंतिम दर्शनासाठी लोकप्रतिनिधी, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, आजी-माजी समाजसेवक, शेतकरी, कामगार, व्यापारी व नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.