कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या छताच्या कामाला गती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम संथगतीने सुरू होते. या आठवड्यात मात्र छताला फळ्या मारण्याचे काम सुरू आहे. यानंतर वॉटरप्रूफिंगचे काम केले जाणार आहे. त्यानंतर कौले बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील ही कामे झाल्यानंतर, दुसर्या टप्प्यातील कामांना सुरुवात होणार आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट 2024 ला आग लागली. या आगीमध्ये नाट्यगृहाचे छत जळून खाक झाले. इतर सर्व साहित्याचेही नुकसान झाले. त्यानंतर या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने 25 कोटींचा निधी जाहीर केला. विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी हा निधी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला. महापालिकेने या कामासाठी तत्काळ सल्लागार कंपनी नेमून निविदा मागविल्या. पहिल्या टप्प्यातील सुमारे सात कोटींचे काम लक्ष्मी हेरिकोम या हैदराबाद येथील कंपनीला देण्यात आले. ऑक्टोबर 2024 पासून हे काम सुरू आहे. भिंतीचे रिस्टोरेशन करणे आणि छताच्या उभारणीचे कामांचा यामध्ये समावेश आहे.
मधल्या काळात हे काम संथगतीने सुरू होते. आता पुन्हा कामाला गती आली आहे. छतावर पट्टा मारुन फळ्या मारण्यात आल्या आहेत. त्यानंतर वॉटरप्रूफिंग केले जाणार आहे. त्यानंतर कौले बसविण्यात येतील. कामाची मुदत संपल्याने ठेकेदार कंपनीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
दुसर्या टप्प्यात नाट्यगृहाचे स्टेज, इलेक्ट्रिकच्या कामाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील काम संपल्याशिवाय हे काम सुरू होणार नाही. त्यामुळे या कामाला आणखी गती द्यावी लागणार आहे.