kolhapur | केशवराव नाट्यगृह, सीपीआरमधील नूतनीकरणाचे आज लोकार्पण 
कोल्हापूर

kolhapur | केशवराव नाट्यगृह, सीपीआरमधील नूतनीकरणाचे आज लोकार्पण

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे व पवार यांच्या उपस्थितीत सोहळा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व सीपीआरमधील नूतनीकरण केलेल्या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर ७ प्रकल्पांचे लोकार्पण आणि एका प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा दुपारी ४ वा. होणार आहे.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी २५.१० कोटी रुपये निधीतून करण्यात आली आहे. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ६.६६ कोटी रुपये खर्चून ॲस्ट्रोटर्फ युक्त मैदान आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दुधाळी येथे १२ कोटी रुपये खर्चून सहा दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे.

अंबाबाई मंदिर परिसरातील वाहतूक आणि पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी ३८.८० कोटी रुपये निधीतून बहुमजली पार्किंग इमारत उभारली आहे. तसेच गोकुळ हॉटेल परिसरात ४.५० कोटी रुपये खर्चून मेकॅनिकल पार्किंग उभारले आहे. नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या विकासासाठी ९.४० कोटीतून विकासकामे केली आहेत. रंकाळा तलावात ५ कोटी रुपये खर्चून आकर्षक संगीत कारंजा उभारला आहे. कोल्हापूर पोलिसांसाठी १८६ कोटी निधीतून शहरात ६७२ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या सर्वांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होईल. सायंकाळी ५ वा. कागलमधील श्रीराम मंदिराची पाहणी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण व शाळा नूतनीकरण कार्यक्रम आहे. त्यानंतर सायंकाळी ५.१५ वा. कागल येथे शेतकरी मेळावा होणार आहे.

महापूर नियंत्रण प्रकल्पाचे भूमिपूजन

कोल्हापूर आणि सांगलीतील महापूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून या प्रकल्पासाठी ३,२०० कोटी रु. कर्ज मंजूर झाले आहे. महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत ४८४ कोटी कोल्हापूर शहरातील कामासाठी मंजूर आहेत. नाल्याच्या परिसरात वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅकसह इतर सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. या कामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT