विशाळगड : शिवकालीन किल्ले विशाळगड मार्गावरील केंबुर्णेवाडीत सकाळी १० पर्यंत थांबणाऱ्या पर्यटकांकडून परिसरात अस्वच्छता केली जात असून घाणीचे साम्राज्य पसरत आहे. परिणामी दुर्गंधी पसरली आहे. येथील पोलीस नाका हटविण्याची मागणी सुरेश जाधव, विष्णू निवळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
सहा महिन्यांपूर्वी (१४ जुलै २०२४) विशाळगड अतिक्रमण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागून याचा फटका अतिक्रमणाचा काडीमात्र संबंध नसलेल्या गजापूरपैकी मुसलमान वस्तीला बसला. आंदोलनकर्त्यांनी येथील घरांची, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करून प्रापंचिक साहित्याचे मोठे आर्थिक नुकसान केले. परिणामी गडावर संचारबंनदी लागू करून पांढरेपाणी, केंबुर्णेवाडी, गजापूर, मुसलमानवाडी आणि गड पायथा अशा पाच ठिकाणी पोलीस बंदोबस्त नाका उभारून विशाळगडावर पर्यटकांना जाण्यास बंदी घातली होती. परिणामी संचारबंदीमुळे पर्यटकांनी इकडे पाठ फिरविली होती. घटनेच्या २५ दिवसानंतर ( ८ ऑगस्ट) रोजी पांढरेपाणी येथील पोलीस नाका बंद करून पावनखिंड पर्यटनासाठी खुली करण्यात आली होती.
टप्प्याटप्प्याने गजापूर, मुसलमानवाडी येथील पोलीस बंदोबस्त नाका बंद केला. मात्र आंबा व मलकापूरहुन येणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी गडापासून आठ किलोमीटर अंतरावर असणारा केंबुर्णेवाडीतील पोलीस नाका अद्याप सुरु आहे. येथे दररोज चार ते पाच पोलिसांचा पहारा असतो. पर्यटकांची आधार कार्डे तपासून त्यांना सोडले जाते. प्रशासनने दि. ५ ते ३१ जानेवारीपर्यंत पर्यटकांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वेळेत प्रशासनाच्या नियमाचे पालन करून गड पर्यटनासाठी खुला केल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कर्नाटक, इतर जिल्ह्यातील पर्यटक पहाटेच केंबुर्णेवाडीच्या नाक्यावर येत आहे. येथे पोलिसांकडून त्यांना रोखून सकाळी दहानंतर सोडले जात असल्याने या कालावधीत पर्यटकांकडून प्रात:विधिसह प्लास्टिक बाटल्या, पत्रावळ्या, द्रोण आदीचे परिसरात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरवले जात आहे. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे.
गडावरील वाढलेली अतिक्रमणे काढताना संचारबंदी, हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्याची पुनरावृत्ती केंबुर्णेवाडीत होऊ नये ही ग्रामस्थांची अपेक्षा आहे. पर्यटकांना थांबण्यास ग्रामस्थांचा कोणताही विरोध नाही. संबंधित विभागाने पर्यटकांकडून परिसरात होणाऱ्या घाणीच्या साम्राज्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.