कोल्हापूर : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी अंबाबाई मंदिर परिसरात पाहणी केली. 
कोल्हापूर

Ambabai Temple Encroachment | अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे १० जूनपर्यंत काढा, अन्यथा कारवाई

जिल्हाधिकारी, आयुक्त यांचे आदेश; मेन राजाराम हायस्कूलचे पार्किंग खुले करा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे १० जूनपर्यंत काढून घ्या, अन्यथा ती हटवा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीत अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यावरून चर्चा झाली होती. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संयुक्त पाहणी करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी अंबाबाई मंदिर परिसरात पाहणी केली. राजाराम हायस्कूलजवळील पार्किंग जागेची पाहणी करण्यात आली. ही पार्किंग सुविधा कायमस्वरूपी खुली ठेवा. पागा बिल्डिंग येथील सार्वजनिक शौचालय स्वच्छ व सुस्थितीत ठेवा. विद्यापीठ हायस्कूलसमोरील परिसरात नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करा, अशा सूचना यावेळी डॉ. राठोड यांनी केल्या.

महाद्वार रोड, जोतिबा रोड व मंदिरालगतच्या परिसरातील अतिक्रमणांची पाहणी करण्यात आली. या परिसरातील सर्व अतिक्रमणे संबधितांनी दहा जूनपूर्वी काढून घ्यावी, त्यानंतर यंत्रणेने ती तातडीने हटवावीत, असे आदेश दिले. मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्या. त्याकरिता मंदिरालगत असलेले फूल विक्रेत्यांचे स्टॉल हटविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

देवस्थान समितीने मंदिर परिसरात अधिक सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. त्याद्वारे महाद्वार रोड परिसर मोकळा व सुव्यवस्थित ठेवा, अशा सूचना आयुक्त डॉ. भारुड यांनी केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहायक आयुक्त स्वाती दुधाने, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, इस्टेट ऑफिसर शेखर साळुंखे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोंढे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT