कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींवरील बंदी उठविल्याने जिल्ह्यातील दीड हजार मूर्तिकारांनी बनवलेल्या पीओपीच्या मूर्तीसाठी नैसर्गिक रंग वापरण्याची सूचना काकोडकर अहवालात करण्यात आली आहे. कृत्रिम कुंडात विसर्जित करण्याच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. कोल्हापुरातील मूर्तिकारांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी साडेतीन ते चार लाख घरगुती गणेशमूर्ती तयार केल्या जातात. तर सव्वा लाख मोठ्या मूर्ती बनवल्या जातात. जवळपास दीड हजार मूर्तिकार व त्यांचे कुटुंबीय गणेश चतुर्थीपूर्वी सहा महिन्यांपासून मूर्ती तयार करण्याचे काम करतात. शहरात पापाची तिकटी, कुंभार गल्ली, शाहूपुरी, कुंभार गल्ली, बापट कँप यासह उपनगरातील कुंभारवाड्यात ही लगबग सुरु असते. तयार मूर्तींपैकी 90 टक्के मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवल्या जातात. शाडूची उपलब्धता कमी असल्याने मूर्तीच्या दरावर त्याचा परिणाम होतो.
पीओपी गणेशमूर्तींना न्यायालयाने हिरवा कंदील देताना पर्यावरणपूरक विसर्जनाचा नियम लागू केला आहे. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून कोल्हापुरातील पर्यावरणप्रेमी व्यक्ती व संघटनांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाचा जागर सुरू आहे. याला यश आले असून सध्या कोल्हापुरात काहिलीत, कृत्रिम कुंडात तसेच घराच्या आवारातील बागेत, बादलीत विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो.