धीरज बरगे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 43 हजार शेतकर्यांची 88 हजार बँक खाती थकीत आहेत. थकबाकीची रक्कम 631 कोटी रुपये आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. याअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर झाली. योजनेच्या घोषणेने जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाकडून योजनेचे निकष जाहीर केल्यानंतर किती शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार हे स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील एकूण शेतकर्यांपैकी 80 टक्के शेतकर्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने पीक कर्जाचा पुरवठा केला जातो. 2024-25 या आर्थिक वर्षात बँकेने जिल्ह्यातील 1937 विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून 2 लाख 60 हजार शेतकर्यांना पीक कर्जाचा पुरवठा केला आहे. 30 जून 2025 अखेरपर्यंत वितरित केलेल्या 2587 कोटी रुपये शेती व पीक कर्जापैकी 2332 कोटी रुपये कर्ज वसूल झाले आहे. त्यानुसार बँकेने वितरित केलेल्या कर्जापैकी 90.14 टक्के कर्ज वसूल केले आहे.
महायुती सरकाने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार सत्तेत येऊन वर्ष उलटले तरी कर्जमाफीबाबत निर्णय प्रलंबित होता. अखेर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकीत शेतकर्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
दोन लाखहून अधिक शेतकर्यांकडून कर्जफेड
नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना राज्य सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे दोन लाखहून अधिक शेतकर्यांनी कर्जफेड केली आहे. शासनाच्या निकषानुसार यापैकी किती शेतकरी अनुदानास पात्र ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
कर्जमाफीच्या घोषणेने थकबाकी वाढली
जिल्हा मध्यवर्ती बँकेने 2024-25 मध्ये वितरित केलेल्या कर्जापैकी 97 ते 98 टक्के कर्ज वसूल होईल अशी अपेक्षा धरली होती. मात्र दरम्यान कर्जमाफीबाबत झालेल्या घोषणेमुळे काही शेतकर्यांनी कर्ज भरले नाही. त्यामुळे 90 टक्क्यांवर कर्जवसुली थांबली.