कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी आले आहे. त्याचा फटका भाजीपाला आणि दूध उत्पादकांना बसत आहे. कोल्हापूर बाजार समितीत भाजीपाल्याची आवक निम्म्याने घटली आहे; तर गोकुळसह विविध दूध संघांकडे दररोज सुमारे 15 हजार लिटर दूधाची घट होत आहे.
बाजार समितीत शिरोळ, नांदणी, घटप्रभा, चिक्कोडी, संकेश्वरसह जिल्ह्यातील अनेक भागातून भाजीपाल्याची आवक होते. दररोज सुमारे 2500 क्विंटल ही आवक होत होती. सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शिवारात पाणी झाले आहे. त्यामुळे भाजीची तोडणी करण्यास अडथळे येत आहेत. त्याचा परिणाम भाजीपाला आवकेत होत असून दररोज समितीत एक हजार ते बाराशे क्विंटलने घट झाली आहे. परिणामी वांगी, टोमॅटो, ओली मिरची, ढब्बू मिरची, गवार, दोडका, भेंडी यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असून या सर्व भाज्या शंभर रुपये किलो दराने बाजारात मिळू लागल्या आहेत.
जिल्ह्यात गोकुळ, वारणासह अन्य खासगी संघाकडून दूध संकलन केले जाते. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले असून त्यावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली. यामुळे दूध वाहतूक करण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. सर्वात जास्त फटका गोकुळ दूध संघाला बसला आहे. संघाच्या संकलनात दररोज 8 ते 9 हजार लिटरची घट होत आहे. याचा फटका उत्पादकांना बसत आहे. पावसाळी वातावरणामुळे म्हैस दूध संकलनात घट झाली आहे.