कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाने उसंत घेतली असली, तरी आज मंगळवारी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, दिवसभरात नद्यांच्या पातळीत वाढ सुरूच असून, आणखी 11 बंधार्यांवर पाणी आले. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेल्या बंधार्यांची संख्या 16 वर गेली. यामुळे तीन मार्गांवरील वाहतूक बंद झाली असून, ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. पन्हाळा तालुक्यातील मुसलमानवाडी येथे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने शेतजमीन वाहून गेली.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी मात्र पावसाने थोडी उघडीप दिली. सूर्यदर्शन झाले नसले तरी अधूनमधून बरसलेल्या सरी वगळता पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीतही एका फुटाने वाढ झाली. पंचगंगेवरील शिंगणापूर बंधारा दुपारी पाण्याखाली गेला. यामुळे शिंगणापूर-चिखली या मार्गावरील वाहतूक बंद झाली. पंचगंगेवरील इचलकरंजी आणि शिरोळ बंधाराही पाण्याखाली गेला. दरम्यान, रात्री पंचगंगेची पातळी 19 फुटांवर गेली.
भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे हे बंधारे पाण्याखाली गेले. यामुळे कोगे-बहिरेश्वर मार्गावरील थेट वाहतूक बंद झाली. तुळशी नदीवरील सावरवाडी-आरे बंधाराही पाण्याखाली गेला. दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनेर्ली आणि बाचणी बंधारा पाण्याखाली गेले. बाचणी बंधार्यावर पाणी आल्याने बाचणी-वडकशिवाले ही थेट वाहतूक बंद झाली. दिवसभरात 11 बंधारे पाण्याखाली गेल्याने कोगे-बहिरेश्वर, बाचणी-वडकशिवाले, शिंगणापूर-चिखली, शिरोळ-कुरूंदवाड बंधार्यावरील मार्ग, तसेच भुदरगड तालुक्यातील वेंगरूळ-पाळ्याचा हुडा-शिवडाव मार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी पर्यायी रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग बंद झाला आहे.
मुसलमानवाडी (ता. पन्हाळा) येथे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने शेतजमीन वाहून गेली. यामुळे सुमारे अडीच हेक्टर शेतीचे नुकसान झाले. आंबर्डे-वेतवडे दरम्यान असणार्या बंधार्यांचे बरगे काढल्याने नदीचे पाणी वेगाने पुढे सरकले. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने नदीकाठावरील सुमारे अडीच हेक्टर जमीन पिकासह वाहून गेली. याबरोबर एक मोटरपंपही वाहून गेला तर आठ पंपांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पन्हाळ्याचे तहसीलदार माधवी शिंदे व गटविकास अधिकारी सोनाली माडकर, तसेच संबंधित अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.