कोल्हापूर : दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरातील सराफी दुकानात खरेदीसाठी झालेली गर्दी.  (छाया ः पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Dussehra Market | दसऱ्याला ५०० कोटींहून अधिकची विक्रमी उलाढाल

बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर बाजारपेठ ग्राहकांच्या उत्साहाने फुलून गेली होती. गुजरी, सराफ कट्टा, राजारामपुरी, महाद्वार रोड, लक्ष्मी रोड या शहरांच्या मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी उसळली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोने-चांदीच्या बाजारपेठेत मिळून ५०० कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

सराफ बाजारात ग्राहकांनी आगाऊ नोंदणी केलेल्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरतेनंतरही मुहूर्ताची परंपरा राखत नागरिकांनी पारंपरिक कोल्हापुरी साज, ठुशी, बोरमाळ यांसह गोल्ड आणि सिल्व्हर कॉईन्सची जोरदार खरेदी केली. यावर्षी लाईट वेट ज्वेलरी, चोख सोने यांना चांगली मागणी होती. दरवाढीमुळे कमी वजनाच्या दागिन्यांची खरेदी जास्त प्रमाणात होती. त्यात दसऱ्याच्या दिवशी सोन्याचे तोळ्यामागे दर साडेचार हजार रुपये उतरल्याने ग्राहकांचा आनंद द्विगुणित झाला.

दुसरीकडे, वाहन बाजारात नवी गाडी घरी नेण्यासाठी शोरूम्समध्ये शेकडो गाड्यांचे आधीच बुकिंग केलेले होते. या गाड्यांची डिलिव्हरी घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. अनेक शोरुम्समध्ये मंडप घातले होते. इलेक्ट्रिक वाहनांना मिळालेला प्रतिसाद लक्षणीय होता. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिनवर फायनान्सच्या आकर्षक योजनांचा लाभ घेत ग्राहकांनी बंपर खरेदी केली.

मोबाईल फोन्सचीदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी दसऱ्याच्या मुहुर्तावर झाली. गेल्या काही महिन्यांत मोबाईलच्या किंमती वाढल्या असल्या तरी नवनवीन मॉडेल्सचे फोन मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आले. सर्वच मोबाईल शोरुम्समध्ये गर्दी होती. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बाजारपेठेत आणि वाहन शोरूम्समध्ये ग्राहकांच्या प्रचंड गर्दीमुळे चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. प्रमुख ऑटोमोबाईल शोरूम्समध्ये नवीन वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी नागरिकांची तुफान झुंबड उडाली होती. यंदा दुचाकी वाहनांच्या खरेदीने मोठा उच्चांक केला असून, रोजच्या प्रवासाची सोय आणि परवडणाऱ्या बजेटमधील स्कूटर्सना तरुणाई व कुटुंबीयांची विशेष पसंती लाभली. पारंपरिक पेट्रोल वाहनांच्या जोडीला इलेक्ट्रिक वाहनांच्या बुकिंग आणि डिलिव्हरीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT