कोल्हापूर/जयसिंगपूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील कोल्हापूर-सांगली या अंतरासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. नवीन निविदा प्रक्रिया केवळ 28 दिवसांची राहणार आहे. यापूर्वीची निविदा तांत्रिक बिडमधील त्रुटीमुळे रद्द करण्यात आली.
चोकाक ते उदगाव-अंकली या रस्त्याच्या कामासाठी जमीन हस्तांतरण करण्यापूर्वीच सुमारे 33 किलोमीटरच्या मार्गासाठी 1 हजार 192.84 कोटींची निविदा काढण्यात आली होती. 12 ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. अवंतिका कन्स्ट्रक्शनने 8.14 टक्के कमी दराने निविदा भरली होती. मात्र, तांत्रिक बिडमधील त्रुटीमुळे निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून दहा गावांतील शेतकर्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या केल्या आहेत. शेतकर्यांच्या मागण्या मान्य करण्यापूर्वी व जमीन संपादन करण्यापूर्वीच निविदा काढल्याने शिरोळ व हातकणंगले तालुक्यांतील 10 गावांत रोष पसरला होता. दै. ‘पुढारी’ने शेतकर्यांना न्याय देण्यासाठी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
कोल्हापूर-सांगली रस्त्याचा प्रश्न 2012 पासून प्रलंबित आहे. हा रस्ता रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन केला. अंकली ते नागपूर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, चोकाक ते रत्नागिरीपर्यंतचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या एक वर्षापासून चोकाक ते उदगाव-अंकलीपर्यंतच्या भूसंपादनासाठी प्रक्रिया सुरू आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील दहा गावांतील शेतकरी व बाधित नागरिकांनी तीव— विरोध करून चौपट भरपाई द्यावी, उदगाव बायपास महामार्गावरून हा महामार्ग न्यावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
या महामार्गासाठी चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, उदगाव, उमळवाड, अंकली या दहा गावांत भूसंपादन होणार आहे. हातकणंगले येथे उड्डाणपूल, उदगाव कृष्णा नदीवर नव्याने वाहतुकीचे पूल होणार आहेत. महामार्ग 33 किलोमीटरचा असून, यासाठी 1 हजार 192.84 कोटींचा निधी मंजूर आहे. 850 कोटींचा निधी महामार्गासाठी असून, 300 कोटी रुपये भूसंपादनासाठी तरतूद केली आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक ते उदगाव-अंकली वगळता सर्व शेतकर्यांना चौपट भरपाई मिळाल्याने चोकाक ते उदगाव-अंकलीपर्यंतच्या 10 गावांतील शेतकर्यांना चौपट दर द्या. उदगाव येथे सांगली-कोल्हापूर बायपाससाठीच 2012 व 2016 साली दोनवेळा भूसंपादन केले असून, महापुराचा धोका टाळण्यासाठी उदगाव येथील बायपास मार्गावरूनच नवा राष्ट्रीय महार्गावरून न्यावा.