कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र रेल्वे मार्गाने कोकणला जोडण्याचे स्वप्न आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गासाठी फेरसर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली. पुणे येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व सोलापूर विभागातील खासदारांची बैठक झाली. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर-वैभवाडी रेल्वे मार्गाची दहा वर्षांपूर्वी घोषणा झाली. त्याला मंजुरी मिळाली. निधीची तरतूदही झाली; मात्र या मार्गाने अद्याप गती घेतली नाही. या मार्गाची सद्यस्थिती काय, अशी विचारणा बैठकीत करण्यात आली. त्यावर या मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोल्हापूर-मुंबई वंदे भारत सुरू करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर राज्यात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या वंदे भारतबाबतचे प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
‘कोल्हापूर-मिरज’ दुहेरीकरणासाठी लवकरच डीपीआर
कोल्हापूर-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासाठी लवकरच डीपीआर तयार केला जाणार आहे. हा डीपीआर झाल्यावर दुहेरीकरणाचे काम हाती घेतले जाईल, असेही सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या अखेरच्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केलेला हातकणंगले-इचलकरंजी मार्ग रद्द केला जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. या मार्गाबाबत केलेले सर्वेक्षण आणि त्यानुसार प्राप्त अहवालात मार्गाबाबत नकारात्मक बाबी अधिक असल्याने हा मार्ग रद्द केला जाणार आहे.
या खासदारांची उपस्थिती
बैठकीत खासदार श्रीरंग बारणे, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. अमोल कोल्हे, नीलेश लंके, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, विशाल पाटील, धैर्यशील माने, शिवाजी काळगे, डॉ. ज्योती वाघमारे व मेधा कुलकर्णी यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.