कोल्हापूर : सह्याद्री पर्वतरांगेतील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एका नव्या वाघाची नोंद झाली आहे. या नर वाघाचे नामकरण ‘रायबा’ असे करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात काही महिन्यांपासून या वाघाचा वावर आहे. या वाघाचे छायाचित्र वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेर्यात कैद झाले आहे. यावरून या वाघाची नोंद करण्यात आली आहे.
* तीन ते चार वर्षे वयाचा हा सुद़ृढ वाघ यापूर्वी वन विभागाच्या रेकॉर्डवर नव्हता.
* डिसेंबर 2025 मध्ये प्रथमच ट्रॅप कॅमेर्यातून त्याचे स्पष्ट छायाचित्र टिपण्यात आले.
* नोव्हेंबर 2025 : रायबाच्या पाऊलखुणा आढळल्या.
* 8 डिसेंबर 2025 : नव्या वाघाची विष्ठा आढळली; 13 डिसेंबर 2025 : वाघ कॅमेरा ट्रॅप झाला.
* या वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचनेची तुलना सिंधुदुर्ग आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघांशीही करण्यात आली होती.
* मात्र त्यांचा कोणताही मेळ न बसल्याने हा वाघ नवा असल्याचे सिद्ध झाले.
रायबा (एसटीआर टी 07) नामकरण
राधानगरी वन्य जीव अभयारण्याचे व्यवस्थापन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे येत असल्याने नव्या वाघाला ‘एसटीआर टी 07’ हा सांकेतिक क्रमांक दिला असून स्थानिकांनी प्रेमाने त्याचे नामकरण ‘रायबा’ असे केले आहे.