राधानगरी : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला राऊतवाडी धबधबा कोसळू लागला असून, पर्यटकांची गर्दी वाढत आहे. जिल्ह्याच्या पर्यटन नकाशात अग्रस्थानी असलेल्या राधानगरी-दाजीपूर परिसरात कोसळणार्या सर्वाधिक पावसामुळे हा निसर्गसंपन्न धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांच्या पसंतीस पडला आहे.
गर्द हिरवाई, घनदाट अभयारण्य, हुडहुडी भरवणारी बोचरी थंडी आणि त्यातच कोसळणारा मुसळधार पाऊस, दाट धुक्यातून वाट शोधत जाणारे घाट पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे. पावसाचे आगर असलेल्या राधानगरीत पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे राऊतवाडी धबधबा कोसळू लागल्यामुळे सह्याद्रीच्या उंच डोंगररांगातून कोसळणारे धबधबे, राधानगरी धरण आणि खासकरून राऊतवाडी धबधबा यामुळे घाटातून नजरेच्या टप्प्यापर्यंत पावसाच्या सरीमध्ये ओलेचिंब होण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.