कोल्हापूर : उन्हाळा सुरू झाला की, रत्नागिरी-देवगडच्या हापूस आंब्याचा सुगंध आणि गोडवा मनाला भुरळ घालतो. मात्र, यंदा हा गोडवा सर्वसामान्यांना सहजासहजी चाखता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. आंब्याच्या उत्पादनात झालेली मोठी घट आणि बाजारातील मर्यादित आवक, यामुळे दर सध्या गगनाला भिडले आहेत. परिणामी, सामान्य ग्राहकांसाठी हा आंबा सध्या खरेदीच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
यंदा आंब्याची आवक तब्बल 70 टक्क्यांनी घटली. गतवर्षी एप्रिल महिन्यात 48 हजार 710 क्विंटल हापूस बाजारात दाखल झाला होता, तर यंदा 1 ते 15 एप्रिलदरम्यान ही संख्या केवळ 13 हजार 592 क्विंटलवरच थांबली आहे. कमी पुरवठा आणि वाढती मागणी, यामुळे बाजारात दर तेजीतच आहे. गतवर्षी प्रतिक्विंटल सरासरी 3,500 रुपये असलेला दर यंदा तब्बल 8,000 रुपयांवर पोहोचला. काही ठिकाणी लिलावात हा दर 25,000 रुपयांपर्यंत झेपावत आहे.
सध्या आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत. मात्र, अक्षय तृतीयेनंतर बाजारात आवक वाढेल आणि दर काही प्रमाणात कमी होतील. हापूसचा गोडवा चाखण्यासाठी सर्वसामान्यांना अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.प्रसाद वळंजू, व्यापारी
किरकोळ बाजारातही देवगड हापूसच्या 12 ते 15 नगांच्या पेटीसाठी 700 ते 1,500 रुपये मोजावे लागत आहेत, तर रत्नागिरी हापूसचा पाच डझनांचा बॉक्स 3,000 ते 5,500 रुपयांदरम्यान विकला जात आहे. कोल्हापूर बाजारपेठेत स्थानिकांसोबतच बाहेरील व्यापार्यांचीही मोठी गर्दी आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दरात सध्या कोणतीही घसरण दिसत नाही.