कोल्हापूर : जिल्ह्यात सात दिवसांपासून रेशनवरील धान्य वाटप बंद आहे. सर्व्हर डाऊन असल्याने दुकानातील ई-पॉस मशिन बंद आहे. यामुळे नागरिकांना धान्यच मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील धान्य वितरण बंद पडले आहे.
राज्यात यावर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांतील धान्य एकत्रित देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार धान्य वाटप सुरू आहे. मात्र, एका महिन्यापुरतेच धान्य दुकानदारांना दिले जात असल्याने दर महिन्याला 33 टक्केच लोकांना धान्य द्यावे लागते. यामुळे जे धान्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यात असंतोष वाढत असतानाच आता गेल्या सात दिवसांपासून सर्व्हर डाऊनमुळे धान्य वितरण ठप्प झाले आहे. सर्व्हर सुरू होईल म्हणून लोक दुकानासमोर थांबून राहत आहेत. मात्र, ई-पॉस मशिन सुरूच होत नसल्याने धान्य न घेताच नागरिकांना परतावे लागत आहे. त्यातून दुकानदार-नागरिकांत वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत.
पॉस मशिनला तांत्रिक अडचण आल्याने सात दिवसांपासून धान्य वाटप ठप्प आहे. तसेच ई-केवायसीही बंद आहे. रेशन महासंघाने प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. वरिष्ठ पातळीवरून तातडीने प्रयत्न करून ही समस्या सोडवावी.- डॉ. रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, रास्तभाव दुकानदार महासंघ