केंबुर्णेवाडी ता शाहूवाडी येथे पतंग प्रवर्गातील 'ॲटलास मॉथ'चे आनंद जाधव यांनी मोबाइल कॅमेऱ्यात कैद कैद केलेले विहंगम दृश्य. 
कोल्हापूर

Atlas moth | छान किती दिसते 'फुलपाखरु'! केंबुर्णेवाडीत दुर्मिळ महाकाय 'ॲटलास मॉथ'चं दर्शन!

पतंगाचे पंख तब्बल १० ते १२ इंचांपर्यंत लांबीचे, पंखांची बाहेरील टोके हुबेहूब 'नागाच्या फण्यासारखी'

पुढारी वृत्तसेवा

सुभाष पाटील

विशाळगड : निसर्गाच्या अगाध किमयेचा एक थक्क करणारा आविष्कार शाहूवाडी तालुक्यातील केंबुर्णेवाडी येथे पाहायला मिळाला आहे. जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असलेल्या आणि अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या 'अटलास मॉथ' या देखण्या फुलपाखराचे येथे दर्शन झाले असून, त्याचे विहंगम रूप येथील आनंद जाधव यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे.

या महाकाय पतंगाचे पंख तब्बल १० ते १२ इंचांपर्यंत पसरलेले असून, त्याच्या पंखांची रचना अत्यंत मनमोहक आहे. या पतंगाच्या पंखांची बाहेरील टोके हुबेहूब 'नागाच्या फण्यासारखी' दिसतात. शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी निसर्गाने त्याला दिलेली ही एक अनोखी देणगीच आहे. लालसर तपकिरी, पांढरा आणि पिवळसर रंगांची उधळण असलेल्या या पतंगाच्या पंखांवर आकर्षक त्रिकोणी नक्षीकाम (पारदर्शक खिडक्यांसारखे भाग) पाहणाऱ्याचे डोळे दिपवून टाकत आहे.

​मुख नसलेला आगळावेगळा जीव!

या पतंगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्थाच नसते! सुरवंट अवस्थेत असताना ते जे अन्न साठवते, त्यावरच त्याचा पुढील प्रवास चालतो. अन्न ग्रहण करता येत नसल्याने याचे आयुष्य अवघे १ ते २ आठवड्यांचेच असते. मादी पतंग १०० ते २०० अंडी घालते आणि त्यानंतर तिचा मृत्यू होतो.

अंडी, सुरवंट, कोष आणि पतंग अशा चार टप्प्यांत जीवनक्रम जगणारा हा जीव प्रामुख्याने दक्षिण-पूर्व आशियातील जंगलांमध्ये आढळतो. मात्र, काळाच्या ओघात ही दुर्मिळ प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केंबुर्णेवाडीत झालेले त्याचे हे दर्शन निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

गजापूर आणि विशाळगडचा परिसर हा पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला समृद्ध जैवविविधतेचा पट्टा आहे. अशा भागात ‘ॲटलास मॉथ'चे दर्शन होणे हे येथील जंगल आणि पर्यावरण अत्यंत समृद्ध आणि निरोगी असल्याचे उत्तम लक्षण आहे. आनंद जाधव यांनी या दुर्मिळ जीवाला कोणतीही इजा न पोहोचवता त्याचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून, सध्या सोशल मीडियावर या 'महाकाय फुलपाखराची' जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT