प्रवीण मस्के
कोल्हापूर : स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यगाथा व त्यागाचे दर्शन घडविणारे एक अनोखे प्रदर्शन 15 ऑगस्ट रोजी राजाराम महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने भरविले आहे. यातून तरुण पिढीला स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदान, त्यागाची जाणीव होणार आहे.
स्वातंत्र्यसैनिक व इतिहास संशोधक बा. बा. महाराज यांनी आयुष्यभर अथक परिश्रम, संशोधन व देशभक्तीच्या ओढीतून उभारलेला हा संग्रह स्वातंत्र्यलढ्याची सजीव कहाणी आहे. प्रदर्शनात महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा अस्थिकलश येथे आहे. 1857 च्या उठावातील शस्त्रांचादेखील प्रदर्शनात समावेश आहे. त्या काळातील भारतीय क्रांतिकारकांनी वापरलेली खरी शस्त्रे येथे पाहायला मिळणार आहेत. मेजर जनरल जगन्नाथराव भोसले यांचा लष्करी कोट व मिलिटरी बॅटन प्रदर्शित होणार आहे. कॅप्टन रामसिंह जे सुभाषबाबूंचे निकट सहकारी होते, त्यांच्या वापरातील शस्त्रे येथे आहेत.
राजगुरू यांच्या वापरातील शस्त्रेही येथे पाहता येणार आहेत. महात्मा गांधीजी यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांची छायाचित्रे प्रदर्शनात ठेवली आहेत. क्रांतिकारकांचा छायाचित्र संग्रह आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाच्या घटनांचे तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये आलेले वृत्त या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. 1857 चा स्वातंत्र्यलढा आणि दुर्मीळ दस्तऐवज प्रदर्शनात ठेवला आहे. मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्याचा 18 एप्रिल 1857 रोजी शिमला येथील मुख्यालयातून कर्नल चेस्टर यांनी काढलेला हुकूम या आदेशाची मूळ प्रत पाहायला मिळणार आहे.
तरुण पिढीसमोर देशप्रेम भावना जागृत ठेवण्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामाशी दुर्मीळ छायाचित्रे आणि वस्तू यांचे प्रदर्शन भरवून तरुणांना आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.डॉ. ऋषीकेश दळवी, इतिहास विभागप्रमुख, राजाराम महाविद्यालय