गगनबावडा : अत्यंत दुर्मिळ असा 'काळतोंड्या' नावाचा बिनविषारी साप निवडे (ता.गगनबावडा) येथील शुभम आळवेकर यांच्या घरी आढळून आला. निसर्गाच्या जैवविविधतेने नटलेल्या गगनबावडा भागात अनेक पशुपक्षी सरीसृप आढळतात, परंतु गगनबावडा तालुक्यात पहिल्यांदाच हा साप आढळून आला.
सर्पमित्र महादेव पानारी यांना हा साप शुभम आळवेकर यांचा घरी जाऊन हा साप पकडला. या सापाविषयी जास्त माहिती उपलब्ध नसल्यामुळे सर्पतज्ञ शोएब बोबडे, गणेश कदम यांच्या कडून अधिक माहिती घेण्यात आली. वनविभाग गगनबावडा रेस्कुयू टीमचे समाधान व्होवळे यांचेकडे हा साप देण्यात आला. या सर्पाची नोंद घेवून सदर सर्पाला जंगल अधिवासात सोडण्यात आले.
सापाचे नाव काळतोंड्या असून याला कृष्णशीर्ष असेही म्हटले जाते. याचे इंग्रजी नाव 'ड्युमलेरी ब्लॅक हेडेड स्नेक' आहे. तसेच याचे शास्त्रीय नाव 'सिबोनोपीस सबकटेटअस्' आहे. हा साप बिन विषारी असून याची लांबी एक ते दीड फूट असते याचा रंग लालसर तपकिरी असून शरीरावर छोट्या काळ्या ठिपक्याची रांग असते. डोके काळे, लांब गोलाकार, शरीर लांब, निमुळती शेपूट असते. तसेच अंडी देणारा हा साप आहे. हा साप भारताच्या मध्यभागापासून खाली दक्षिण पर्यंत आढळतो. हा साप दगडाखाली लाकडा खाली पालापाचोळ्यात राहणे पसंत करतो.