इचलकरंजी : शहापूर परिसरात दुर्मीळ प्रजातीचा बेडोमचा मांजर्या साप आढळून आल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. बाबासाहेब खंजिरे इंडस्ट्री परिसरात साप आढळल्याची माहिती मिळताच वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर पोवार, समर्थ सांगले, अश्विनी सांगले आणि राहुल अडतरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान संबंधित साप हा दुर्मीळ प्रजातीतील ‘बेडोमचा मांजर्या साप’ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सापाला सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर पोवार यांनी सांगितले की, बेडोमचा मांजर्या साप ही दुर्मीळ प्रजाती असून तो अर्धविषारी स्वरूपाचा असून तो झाडांवर वास्तव्य करतो. या सापाचे शहरी परिसरात दर्शन होणे ही वन्यजीव संवर्धनासाठी सकारात्मक बाब असल्याचेही सांगितले.