कोल्हापूर : उद्या कोल्हापुरात नवीन विषय... मासा... अशा आशयाची सोशल मीडियावर व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने फुलेवाडी रिंगरोडवरील ‘फ्रेंडशिप फिश कंपनी’ येथे छापा टाकून दुर्मीळ व संरक्षित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ हा मृत मासा जप्त केला. मराठीत याला पाकट किंवा वागळ असे म्हणतात.
तब्बल 130 किलो वजनाचा हा मासा मुंबई फिश मार्केट येथून विक्रीसाठी कोल्हापुरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत जागेवर जाऊन पंचनामा करून मृत मासा ताब्यात घेतला. याप्रकरणी वनरक्षक करवीर यांनी दिलेल्या प्रथम गुन्हा अहवालावरून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुनील विनोद सातपुते (रा. येडेमछिंद्र, ता. वाळवा, जि. सांगली) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विलास काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी करवीर नंदकुमार नलवडे, वनपाल करवीर सागर कोळी, वनरक्षक ओंकार भोसले, विकास घोलप, महादेव कुंभार, विदेश तांबे, प्रादेशिक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बावळेकर व मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी हे करीत आहेत.
वन विभागाचे नागरिकांना आवाहन
कोणत्याही संरक्षित वन्यजीवांची विक्री, खरेदी किंवा साठा करणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारची माहिती त्वरित वन विभागाला या टोल फ्री क्रमांक : 1926 वर कळवावी, असे आवाहन वन विभागाने नागरिकांना केले आहे.
माशासंदर्भात विशेष माहिती
‘शॉर्टफिन डेव्हिल रे’ (Mobula kuhlii)
स्थान व ओळख :
शॉर्टफिन डेव्हिल रे हा रे (Ray) प्रकारातील सागरी मासा असून, तो मुख्यतः हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील उबदार पाण्यात आढळतो. भारताच्या किनारपट्टीलाही तो कधीतरी आढळतो.
वैशिष्ट्ये :
शरीर सपाट व रुंद पंखांसारख्या परांनी युक्त.
पुढील बाजूस शिंगांसारखे दिसणारे ‘सेफॅलिक लोब्स.’
लांबी साधारणत: 1 ते 1.5 मीटरपर्यंत.
प्लँक्टन व लहान मासे हे मुख्य अन्न.
पर्यावरणीय महत्त्व : हा मासा सागरी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. तो प्लँक्टनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतो. सागरी परिसंस्थेच्या आरोग्यासाठी त्याचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
संरक्षण दर्जा : आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना (IUCN)) कडून मएपवरपसशीशवफ (धोकाग्रस्त) श्रेणीत समावेश. भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित प्रजातींमध्ये समावेश. त्यांची शिकार, विक्री किंवा साठवणूक करणे दंडनीय गुन्हा आहे.