सागर यादव
कोल्हापूर : भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाला नवे दृश्य पुरावे देणारा अत्यंत दुर्मीळ शोध अभिलेखागारातून समोर आला आहे. इसवी सन १८५३ मधील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे एक चित्र भोपाळ पुरालेखागारात सापडले आहे.
मूळचे कोल्हापूर, महाराष्ट्राचे आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ पुरातत्त्व व अभिलेख प्रशासनात आयुक्त म्हणून कार्यरत असणारे मदनकुमार नागरगोजे यांच्या प्रयत्नातून हे दुर्मीळ चित्र प्रकाशात आले आहे. चित्राचा मोठा भाग कालौघात खराब झाला आहे. पूर्वी दतिया जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या नागरगोजे यांनी ‘ज्ञान भारतम’ अभियान बैठकीत दतियाचे विद्यमान जिल्हाधिकारी स्वप्निल वानखेडे यांच्यासोबत चर्चा करून संग्रहालयातील दुर्मीळ चित्रे व राजकीय अभिलेखांच्या संशोधनासाठी पुरातत्त्वज्ञ डॉ. वसीम खान, अभिलेख तज्ज्ञ नीलेश लोखंडे आणि ग्वाल्हेर विभागाचे उपसंचालक पी. सी. महोनिया यांची नियुक्ती केली.
घोड्यावर राणी आणि दामोदरराव
तज्ज्ञांच्या मते, या चित्रात राणी लक्ष्मीबाई यांची राजकीय किंवा धार्मिक मिरवणूक दर्शविण्यात आली असावी. चित्रातील राणीच्या शेजारी तिचा दत्तकपुत्र दामोदरराव बसलेला असावा. १८५३ मध्ये राणी लक्ष्मीबाईंनी दत्तक घेतलेल्या आनंदराव नेवाळकर याचे नामकरण दामोदरराव झाले.
मराठा-बुंदेलखंड दरबारी कलेची वैशिष्ट्ये
चित्रात १९ व्या शतकातील बुंदेलखंड-मराठा दरबारी शैलीची लक्षणे स्पष्ट दिसतात. समृद्ध अलंकारांनी सजविलेल्या अरबी घोड्यावर स्वार राणीच्या शिरोभूषणावर मराठा शैलीतील रत्नजडित कलगी, हातात वक्र समशेर, पारंपरिक चुडीदार पोशाख, अलंकार व कानातील दागिने आहेत. मिरवणुकीत सेवक, मोराच्या आकृतीचा चवर, घोड्यावरील रुपेरी धाग्यांची नक्षी आणि अत्यंत सूक्ष्म चेहऱ्याची रेखाटने ही या चित्राची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
अभिलेखांतील नोंदी अन् १८५७ चा मौखिक इतिहास
दतिया अभिलेख नोंदवहींमध्ये या चित्राचा उल्लेख विस्तृत राजकीय संग्रहाचा भाग असल्याचे सांगण्यात येते. महाराज किशनसिंह जुदेव यांनी १९८६ मध्ये हा संग्रह राज्य पुरातत्त्व अभिलेखागाराकडे हस्तांतरित केला. पथकातील डॉ. वसीम खान यांनी आपल्या कुटुंबात जतन झालेल्या मौखिक इतिहासांचाही संदर्भ दिला. त्यानुसार गुल मोहम्मद व कासीम खान हे राणीशी संबंधित सेनानी होते. अभिलेख तज्ज्ञ नीलेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरील चित्र-संवर्धनाची तयारी सुरू आहे. ही चित्रे नियंत्रित व अनुकूल अभिलेखीय वातावरणात सुरक्षित ठेवली आहेत.