कोल्हापूर : झोपी गेलेली महापालिका शुक्रवारी जागी झाल्याचे पहायला मिळाले. एरवी वाहनांनी गच्च भरलेला विठ्ठल रामजी शिंदे चौक दिवसभर रिकामा ठेवण्यात आला. भारतीय गुणवत्ता परिषदेची पाहणी होणार असल्याने गुरुवारी रात्रीच चौकाचे डांबरीकरण करण्यात आले. अनेक वर्षांनंतर चौकात कुंड्या ठेवल्याचे दिसून आले. महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील अभिलेख कक्ष, नगररचना विभागातील अभिलेख कक्षातील फायलींवरची धूळ झटकण्यात आली. दिवसभर सर्व कर्मचारी, अधिकारी कार्यालयातच थांबून समितीच्या पाहणीची प्रतीक्षा करत होती. त्यामुळे एरवी भेट न होणारे, अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी जाग्यावर होते. एक दिवसासाठी महापालिकेची मरगळ झटकल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेचा उद्देश सर्व कार्यालये ऑनलाईन स्वच्छ, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण करणे, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश होता. शंभर दिवसांच्या या कार्यक्रमाचे मूल्यांकन करण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषदेची एक टीम शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौर्यावर आली होती. दिवसभरात हे पथक केव्हाही महापालिकेला भेट देणार असल्याने महापालिका प्रशासन सज्ज होते. शिस्तबद्धपणाचा दिखावा महापालिकेत आज दिवसभर सुरू होता. अनेक वर्षे, महिने ढिगार्यात पडलेल्या फायलींवरची धूळ झटकण्यात आली. टेबलवरच्या फायली पटापट हलू लागल्या. एरवी तक्रारीकडे ढुंकूनही न पाहणारे अधिकारी तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पळत होते. अधिकारी, कर्मचार्यांची दिवसभर धावपळ सुरू होती.
समिती येणार म्हणून महापालिकेत सुरू असलेल्या या हालचाली नियमित येणारे नागरिक पाहत होते. महापालिकेतील हा बदल नागरिकांच्या ध्यानात आला. महापालिकेत आज सुरू असलेल्या हालचाली, गतिमानता दररोज पाहायला मिळाव्यात अशी माफक अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात होती.
समितीचे आगमन सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास महापालिकेते झाले. अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले. महापालिका प्रशासकांचे कार्यालयाकडे समितीला नेण्यात येत होते. समितीमध्ये काही ज्येष्ठ सदस्यांचा समावेश होता. प्रशासकांचे कार्यालय आणि कॉन्फरन्स हॉल दुसर्या मजल्यावर असल्याने व उंच जिने असल्याने समितीमधील सदस्यांची दमछाक झाली. अजून किती मजले जायचे आहे. लिफ्ट नाही का? अशी विचारणा सदस्यांनी केली. त्यावेळी महापालिका अधिकार्यांनी ही हेरिटज इमारत असल्याने बदल करता येत नसल्याचे सांगून वेळ मारून नेली.