डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूरचे सौंदर्यशुद्ध प्रतीक ठरलेला रंकाळा तलाव आज अतिक्रमणाच्या विळख्यात गुदमरतोय. अनेक नेते आणि पदाधिकार्यांनी रंकाळ्याला नेकलेस केल्याचा गाजावाजा केला. मात्र, प्रत्यक्षात रंकाळ्याच्या भोवती हातगाड्या, टपर्या आणि केबिन्सचा कब्जा वाढला आहे. सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालणारा रंकाळा आता बकालपणाकडे झुकतोय.
हा प्रवास असाच सुरू राहिला तर काही वर्षांनी रंकाळ्याचा फक्त फोटोच उरतो की काय, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. कारण रंकाळ्याच्या सौंदर्यावर टपर्यांचा, गाड्यांचा इतका अतिक्रमण विळखा बसला आहे की, तलाव अक्षरशः झाकोळला गेला आहे. कोल्हापुरातील प्रमुख आकर्षणस्थळांमध्ये अग्रक्रमाने उल्लेख होणार्या रंकाळा तलावाची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या या तलावाभोवती अनियमित आणि अनधिकृत हातगाड्यांचे पेव फुटले आहे. अगदी प्रत्येक कोपर्यावर खाद्यपदार्थ विकणार्या गाड्यांची गर्दी झाली आहे.
मध्यंतरी एक फेरीवाला थेट रंकाळ्यात कचरा टाकताना पकडला गेला आणि त्याच्यावर कारवाईही झाली. मात्र, रोजच रंकाळ्यात कचरा टाकणार्या अनेक फेरीवाल्यांविरोधात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. कचरा व्यवस्थापनाचा कोणताही नियोजनबद्ध आराखडा नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढत चालली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून रंकाळ्यात कोणतीही कारवाई होत नाही. त्यामागे राजकीय दबाव किंवा अंतर्गत रस्सीखेच कारणीभूत आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कारण आता रंकाळ्याचा एकही कोपरा अतिक्रमणमुक्त राहिलेला नाही.
सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्यासाठी रंकाळा नेहमीच एक शांततेचे ठिकाण होते. परंतु आता फुटपाथवर हातगाड्या, चौपाटीवर टपर्या, तर टॉवरकडे जाणार्या वाटांवर केबिन्सने अडथळा निर्माण केला आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत असून, हे आणखी किती दिवस सहन करायचे? असा सवाल उपस्थित होतोय.