कोल्हापूर : महापालिकेतील शहर अभियंतापदासाठी मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या जोरदार लॉबिंग आणि अंतर्गत स्पर्धेला बुधवारी पूर्णविराम मिळाला. नगरविकास विभागाच्या आदेशानंतर प्रशासकांनी तत्काळ हालचाल करत उपशहर अभियंता रमेश मस्कर यांची शहर अभियंतापदावर नियुक्ती केली आहे, तर एकच महिन्यापूर्वी शहर अभियंतापदावर नियुक्ती झालेल्या कार्यकारी अभियंता दर्जाचे अधिकारी हर्षजित घाटगे यांना पुन्हा एकदा जल अभियंतापदावर समाधान मानावे लागणार आहे. या नियुक्तीमुळे महापालिका वर्तुळात नव्याने चर्चांना उधाण आले आहे.
महापालिकेच्या शहर अभियंतापदासाठी मागील एक महिन्यापासून प्रशासनात वेगवेगळ्या पातळ्यांवर लॉबिंग सुरू होते. नेत्रदीप सरनोबत यांची जूनमध्ये सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे महापालिकेतील अनेकांचे लक्ष होते. कार्यकारी अभियंता हर्षजित घाटगे आणि उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्यात या पदासाठी अंतर्गत चुरस निर्माण झाली होती. याचदरम्यान सरनोबत यांनी मुदतवाढीसाठी प्रयत्न केल्याची माहितीही वर्तुळात चर्चिली जात होती.
1 जून रोजी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी हर्षजित घाटगे यांची नियुक्ती केल्याने या चर्चांना काहीसा विराम मिळाल्याचे चित्र होते. मात्र, राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशीला पवार यांनी दिलेल्या पत्रामुळे नवी कलाटणी आली. या पत्रात अमृत योजना 90 टक्के पूर्ण झालेली असून, ती पूर्ण होईपर्यंत घाटगे यांच्याकडे जल अभियंतापद सोपवण्यात यावे, असा स्पष्ट आदेश देण्यात आला होता.
याच्या अंमलबजावणीत प्रशासकांनी तत्काळ कृती करत रमेश मस्कर यांची शहर अभियंतापदावर नियुक्ती केली, तर हर्षजित घाटगे यांची पुन्हा जल अभियंता म्हणून नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. या बदलामुळे प्रशासनात एकीकडे समाधान व्यक्त होत असतानाच, लॉबिंगच्या प्रभावामुळेच हा फेरबदल झाली का, यावरून महापालिकेच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
महापालिकेतील शहर अभियंतापदामध्ये झालेल्या फेरबदलासंदर्भात उलटसुलट चर्चा आणि प्रतिक्रिया येत असतानाच प्रा. जयंत पाटील यांनी या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. प्रा. पाटील म्हणाले, मस्कर हे उपशहर अभियंता दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारी असून, भ्रष्टाचाराचेही आरोप आहेत. त्यासंदर्भात चौकश्या सुरू आहेत. त्यामुळे या नियुक्तीविरोधात न्यायालयात दाद मागून यासाठी ज्या नेत्यांने ताकद लावली, त्याचाही पर्दाफाश केला जाईल.