Raksha Bandhan
संदीपने किडनी देऊन मरणाच्या दाढेतून बहीण माधुरीला वाचवले file photo
कोल्हापूर

Raksha Bandhan 2024 | ओवाळणीत बहिणीला जीवनदान

पुढारी वृत्तसेवा
तानाजी खोत

कोल्हापूर : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव असलेला रक्षाबंधनाचा सण (Raksha Bandhan 2024) यंदा पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडीचे कृष्णा खोत आणि करवीर तालुक्यातील कुर्डू येथील पवार कुटुंबीयांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. राखी हा केवळ एक धागा नाही, तर बहिणीने भावाकडून आयुष्यभर रक्षण करण्याचे घेतलेले वचन असते. रक्षाबंधनाचा सण ज्या भावनेतून साजरा केला जातो, त्या भावनेचा उत्कट आविष्कार संदीप पवार या भावाने आपल्या माधुरी खोत या बहिणीसाठी केलेल्या त्यागातून व्यक्त झाला आहे.

कुर्र्डू येथील संदीपने बहिणीसाठी एक किडनी देऊन तिला अक्षरशः मरणाच्या दाढेतून वाचवले. किडनी प्रत्यारोपणानंतरचा हा त्यांचा पहिलाच रक्षाबंधन (Raksha Bandhan 2024) सण आहे. ज्या भावाने ओवाळणीमध्ये आयुष्याचे दान दिले त्याला राखी बांधतानाचा क्षण दोघांसाठीही भावुक असणार आहे. गेल्या ऑक्टोबरनंतर माधुरी खोत यांना त्रास होऊ लागला. वजन कमी होऊ लागले. तपासण्यांचा अहवाल आला तेव्हा दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान पाहून धक्का बसला. एकतर किडनी ट्रान्स्प्लांट किंवा उर्वरित आयुष्य डायलेसिसवर काढायचे हे दोनच पर्याय समोर होते. किडनी ट्रान्स्प्लांटसाठी दात्याचा शोध घेणे कठीण होते. त्यामुळे पती कृष्णा आणि माधुरी निराश झाले होते.

कृष्णा म्हणाले की, माधुरीचा भाऊ संदीप तिची अवस्था पाहत होता. डॉक्टरांनी सांगितले तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्याने एक किडनी बहिणीला देण्याची तयारी दाखवली. काहींनी तुझी मुले अजून लहान आहेत, तुला काही झाले तर काय? म्हणून या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. काही झाले तर माझी ताई आणि भाऊजी माझ्या मुलांची काळजी घेतील, असे म्हणून संदीप निर्णयावर ठाम राहिला. मार्चमध्ये कोल्हापुरात किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. या शस्त्रक्रियेने माधुरी यांना नवीन जीवन मिळाले. आज सहा महिन्यांनंतर दोन्ही भावंडांची प्रकृती चांगली आहे.

SCROLL FOR NEXT