दोनवडे : शक्तिपीठ महामार्गाच्या उपशाखेमुळे दोनवडे ते बालिंगे दरम्यान सुमारे 50 फूट उंचीचा भराव पडण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना महापुराचा मोठा धोका निर्माण होणार असून, याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यांनी दोनवडे येथील प्रस्तावित भराव क्षेत्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
शक्तिपीठ महामार्गाची एक उपशाखा कणेरी मठामार्गे बालिंगेमार्गे केर्लीला जाणार आहे. हा मार्ग भोगावती आणि कासारी नद्यांवरून जाणार असल्याने पुलाची उंची वाढवावी लागेल. यासाठी प्रचंड मोठा भराव टाकावा लागणार आहे. सध्याच या भागात 15 ते 20 फुटांचा भराव असून नवीन कामामुळे तो 50 फुटांपर्यंत जाईल, असे शेट्टी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आधीच महापुराने नदीकाठची गावे पाण्याखाली जातात. एवढा मोठा भराव झाल्यास काय हाहाकार उडेल, याची कल्पनाही करता येणार नाही. शासनाने याचा गांभीर्याने विचार न केल्यास संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल. यावेळी स्वाभिमानीचे बाजीराव देवाळकर, अजित पवार, कुंडलिक पाटील, बाजीराव पाटील-दोनवडे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.