कोल्हापूर : उपसा बंदी शिथिल करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी.  (छाया ः नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Raju Shetty | प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच उपसाबंदीचे संकट : माजी खासदार राजू शेट्टी

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शेतीस पाणीपुरवठा करून ३१ ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरेल इतका साठा धरणामध्ये असल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. पाणीसाठा उपलब्ध असतानाही प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांवर उपसा बंदी लादली आहे. प्रशासनाने तत्काळ उपसाबंदी मागे घ्यावी, अशी मागणी शुक्रवारी (दि. १९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, प्रशासनाने वस्तुस्थितीची पाहणी न करता उपसाबंदीचा आदेश लागू केला आहे. पिण्याचे पाणी बंद करून शेतीला पाणी द्या, अशी आमची मागणी नाही. शेतकरी प्रशासनास सहकार्य करण्यास तयार आहे. कडक उन्हाळ्यात अचानक पाणी बंद झाल्यामुळे पिके वाळून बळीराजावर दुहेरी संकट आले आहे. जलसंपदा विभागाने महावितरणला पत्र देऊन शेतकऱ्यांची वीज बंद करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार महावितरणने वीज बंद केली आहे. आताच्या परिस्थितीनुसार किमान ४ ते ५ तास तरी वीज मिळाली, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

यावेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, राजेंद्र गड्यान्नावर, राजाराम देसाई, धनाजी पाटील, संजय बेले, सचिन शिंदे, विश्वास कोळी, डॉ. बाळासाहेब पाटील, व दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता.

निदर्शने, निवेदन आणि बैठक

यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासोबत चर्चा केली.

पुढील आठवड्यात पुन्हा बैठक

उपसा बंदी आदेश तीन दिवसांनी शिथिल केला आहे. पुढील आठवड्यात पुन्हा लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये बैठक होणार आहे. धरणातील शिल्लक पाणीसाठा पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT