कोल्हापूर : राज्यातील कारागृहांमध्ये साहित्य पुरवठ्याचा ठेका एका तुरुंगवासाची शिक्षा भोगून आलेल्या व्यक्तीला देण्यात आला असून यामध्ये 500 कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्यांचा विरोध कायम असल्याचेही स्पष्ट केले.
शेट्टी म्हणाले, बाराशे कोटींच्या पतसंस्था घोटाळ्यात अटक झालेल्या सुनील झंवर या अपात्र व्यक्तीस कारागृहांसाठी साहित्य पुरवठ्याचा ठेका देण्यात आला असून त्याने पंचतारांकित दराने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवले, असा आरोप शेट्टींनी केला. याबाबत कारागृह निरीक्षकांकडेही लेखी तक्रार दिली असून मुख्य सचिवांकडे चौकशीची मागणी करूनही कारवाई झालेली नाही.
यासंदर्भात मुख्य सचिवांकडे चौकशीची मागणी केली असता, त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत ठेकेदाराला पाठीशी घालण्याचेच काम केले जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्यामुळे ठेकेदार व राजकारण्यांसाठी हे एक कुरण बनले आहे, असेही ते म्हणाले. एका बँकेला फसवल्याप्रकरणी अटक केलेला तेजस मोरे नावाचा व्यक्ती तुरुंगात मुक्तपणे वावरत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. वादग्रस्त पोलीस अधिकारी जालंदर सुपेकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकार्यांसोबत त्याचे फोटो असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
साखर कारखान्यांमधील भ्रष्टाचारासंबंधी आम्ही सर्व माहिती भाजपच्या नेत्यांना दिली होती. ते प्रामाणिकपणे चौकशी करतील अशी अपेक्षा होती; परंतु तसे काही झाले नाही. उलट आम्ही दिलेल्या माहितीचा वापर त्यांनी साखर कारखानदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला, असा खळबळजनक आरोपही शेट्टी यांनी केला.
गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यांतील शेतकर्यांचा विरोधच आहे. अनेक ठिकाणी शेतकर्यांनी सर्वेक्षणावेळी ड्रोन दगडाने पाडले आहेत. या कामाची माहिती दिली जात नाही. एवढे त्यामध्ये गोपनीय काय आहे? कोट्यवधीचा मलिदा मिळविण्यासाठीच हा घाट घातला जात आहे. त्याच्या विरोधातील लढा अधिक तीव— करण्यात येईल, असेही ते म्हणाले.