कोल्हापूर : खत कंपन्यांकडून लिंकिंगची सक्ती मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. शेतकर्यांना लिंकिंगची सक्ती झाल्यास वेळ प्रसंगी कायदा हातात घेत दुकाने फोडून शेतकर्यांना खते दिली जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिला.
खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी शेतीच्या तयारीला लागला आहे. आता तो खताची तयारी करत आहे; परंतु युरिया, सुपर फॉस्पेट, डीएपी या खताचा तुटवडा असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. त्यांना लिंकिंगची सक्ती केली जाते. अन्य खते घेतल्याशिवाय युरिया, पोटॅश, डीएपी मिळणार नाही. खत कंपन्याचे स्टॉकिस्ट सक्ती करत आहेत. मुख्यमंत्री, कृषी मंत्री केवळ लिंकिंग करणार्यांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा करतात. प्रत्यक्षात कृती नाही, असा आरोपही शेट्टी यांनी केला.
शेतकर्यांनी एमआरपीपेक्षा एक रुपयाही जादा देऊ नये. लिंकिंगची सक्ती करत असल्यास त्याची माहिती संघटनेला द्यावी. लिंकिंगशिवाय खत न देणार्या दुकानदाराचे वेळप्रसंगी दुकान फोडून खतांचे वाटप करू, असेही शेट्टी म्हणाले. अनुदानित खते सुपर स्टॉकिस्टकडे व नंतर किरकोळ दुकानदारांकडे जातात. इथेच घोळ आहे. खत लिंकिंग सरकारला मोडीत काढावयाचे असेल तर छोट्या विक्रेत्यांना कंपन्यांनी थेट खते द्यावीत. कृषी मंत्र्यांनी कंपन्यांना थेट छोट्या विक्रेत्यांना खत पुरवठा करण्याचा आदेश काढावा. मधल्या दलालांची काही गरज नाही, असेही शेट्टी म्हणाले.