कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांना काँग्रेसने जाहीर केलेली उमेदवारी रद्द केल्यानंतर लाटकर यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. लाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा असली तरी लाटकर निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. दरम्यान, दोन दिवसांत पुन्हा लाटकर यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून ते निश्चितच आमच्या सोबत येतील, असा विश्वास आ. सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्यासह शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राजेश लाटकर, वसंत मुळीक, आनंद माने आदी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली. लाटकर यांची उमेदवारी जाहीर होताच पक्षांतर्गत वाद उफाळून आला. नाव जाहीर झाल्याच्या दिवशीच रात्री उशिरा काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या समर्थकांनी काँग्रेस कमिटीसमोर दगडफेक करत राडा केला. त्यानंतर लाटकर यांची उमेदवारी रद्द करावी, असे 27 नगरसेवकांच्या सहीचे पत्र सतेज पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर मधुरिमाराजे यांचे नाव जाहीर होताच लाटकर यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे.
लाटकर यांनी काँग्रेससोबत राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ज्या पद्धतीने आपली उमेदवारी रद्द करण्यात आली, तो सगळा प्रकारच संतापजनक असून कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतरच निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर माझे समर्थक, कार्यकर्ते ठाम असल्याचे लाटकर यांनी स्पष्ट केले. लाटकर यांची समजूत काढण्यासाठी चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय होईल, लाटकर आमच्या सोबत राहतील, असा विश्वस सतेज पाटील यांनी व्यक्त केला.