कोल्हापूर : महापालिकेत सत्ता भोगूनही अकार्यक्षम ठरलेल्या आ. सतेज पाटील यांनी विधिमंडळाचे कायदे मला शिकवू नयेत. जनतेच्या प्रश्नासाठी अधिकार्यांवर हक्कभंग करणार म्हटल्यावर त्यांना अधिकारी, ठेकेदारांचा पुळका का आला आहे? हिंमत असेल तर शहरवासीयांच्या माथी मारलेल्या गळक्या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी विधिमंडळात करावी, असे आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
निवडणुकीत रस्त्यांची वर्क ऑर्डर झाली नाही असा खोटा अपप्रचार करणारे आ. पाटील तोंडघशी पडले. रस्त्यांच्या कामात दिरंगाई, दर्जा याबाबतच अधिकार्यांवर रोष व्यक्त केला. निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली, तसेच 100 कोटींचे रस्ते करून घेण्याची धमक आहे. त्याची काळजी माजी पालकमंत्र्यांनी करू नये.
टोलची पावती फाडणे, कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचे राजकारण, हद्दवाढीबाबत अबोला, शक्तिपीठ महामार्गाला विरोध या पद्धतीने विकासकामांना बगल देऊन आ. पाटील यांनी कोल्हापूरचे नुकसान केले. जनता आता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. त्यांनी सात नाही, आठ कलर दिले तरी महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असेही आ. क्षीरसागर यांनी पत्रकात आहे.
सणासुदीच्या काळात आ. पाटील यांनी अभ्यंगस्नान केलेली थेट पाईपलाईन बंद पडली. शहरातील माताभगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरत होत्या. त्यांच्यासाठी ठिकठिकाणी भेटी देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकार्यांना सूचना दिल्या. येणार्या दिवाळीत तरी थेट पाईपलाईनने व्यवस्थित अभ्यंगस्नान होईल का? याकडे पाटील यांनी लक्ष द्यावे, असेही आ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे.