कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांनी बडबडत राहावे. आता त्यांना दुसरे कामच उरलेले नाही, असा पलटवार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. शिवाजी चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आ. क्षीरसागर म्हणाले, मनपा निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 15 शिलेदार विजयी झाले. 39 वर्षांत मनपात शिवसेना नगरसेवकांची संख्या 11 हून अधिक गेली नाही. या निवडणुकीत शहरवासीयांनी इतिहास घडविला आहे. मनपात महायुतीचे संख्याबळ 46 आहे. पदासाठी कोणताही वाद नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी मनपात सत्तेवर असताना ज्या पद्धतीने पदे वाटप करत होती, त्यांचा लेखाजोखा घेतला जाईल. यामध्ये जर महापौरपद एका पक्षाकडे असेल तर उपमहापौरपद दुसर्या पक्षाकडे असेल. यासह सर्वच पदे वाटपाचा समतोल महायुती पुढील पाच वर्षे राखेल. महायुतीतील नेते शिवसेनेवर अन्याय होऊ देणार नसून कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे महापौरपदाचे स्वप्न पूर्ण होईल. शिवसेनेला प्रथम संधी द्यायची की दुसर्यांदा याचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतील. कायद्याचा आधार घेऊनच स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले जातील. विधानसभा, मनपाप्रमाणेच जिल्हा परिषदेतही महायुतीला यश मिळेल, असा विश्वासही आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
दिल्लीपेक्षा मुंबई जवळ
कोल्हापुरातील नेते सक्षम नसल्याने मुंबईत महापौर ठरणार आहे, असा आरोप आ. पाटील यांनी केला होता. यावर आ. क्षीरसागर यांनी या आरोपाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. शिवसेनेचे मुख्यालय मुंबईत असल्याने सर्व महत्त्वाचे निर्णय तेथूनच होतात. परंतु त्यांचे मुख्यालय दिल्लीत आहे. त्यांना दिल्लीत जावे लागते. त्या तुलनेने मुंबई फार जवळ आहे.